Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : भारत-चीन अधिकाऱ्यांची आज बैठक , नियंत्रण रेषे जवळच्या ६ नव्या टेकड्यांवर भारतीय सैन्याने मिळवला ताबा

Spread the love

भारत-चीनमध्ये संघर्ष सुरू असताना गेल्या तीन आठवडय़ांत भारतीय लष्कराने चिनी लष्कराला मोठा दणका दिला असून  नियंत्रण रेषे जवळच्या उंचावरच्या ६ नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणं सोपं जाणार आहे. या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. २९ ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. १५ सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान भारत -चीन तणावा संदर्भात दोन्हीही देशातील लष्कर अधिकाऱ्यांमध्ये आज सकाळी ११ वाजता बैठक होत आहे . या बैठकीला भारताकडून मेजर जनरल पद्म शेखावत तर चीनकडून मेजर जनरल लिन लियू हे प्रतिनिधित्व करतील. या बैठकीच्या दरम्यान दोन्हीही देशातील परराष्ट्र विभागाचे सचिवही उपस्थित राहतील. अशा प्रकारची दोन देशांमधील हि सहावी बैठक आहे.

यामध्ये मगर हील, गुरूंग हील, रिसेहेन ला, रेझांग ला, मोखापरी आणि फिंगर-४ जवळची आणखी एक टेकडी अशा सहा ठिकाणी आता भारतीय जवानांचं वर्चस्व आहे. त्यामुळे युद्धाचा प्रसंग आलाच तर भारतीय सैन्याला उंचावरून मारा करणे सोपे जाऊ शकते असा अंदाज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच चीनच्या टेहाळणी नौका भारतीय युद्ध नौकांवर लक्ष ठेवत असल्याची घटना उघडकीस आली होती. चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परीसरात प्रवेश केला होता आणि तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते अशी माहिती समोर आली आहे. त्या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्ध नौकांवर ते सतत लक्ष ठेऊन होते. भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात येताच चीनच्या नौकेने काढता पाय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन भारतीयांवर नजर ठेवत असल्याचं पुढे आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता ही माहिती पुढे आल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढणार आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत. ही सामुद्रधुनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही घटना गंभीर समजली जाते. भारतीय नौदलाच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत सूचक इशारा दिला. शिखरांवर कब्जा करण्याचा चिनी सैन्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील काठापासून दक्षिणेकडील काठापर्यंत तीनदा हवेत गोळीबार करण्यात आला , असेही सूत्रांनी सांगितले. ‘ब्लॅक टॉप’ आणि ‘हेल्मेट टॉप’ ही शिखरे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या बाजूला आहेत, तर भारताने ताबा मिळवलेली शिखरे भारताचे नियंत्रण असलेल्या भागात आहेत. दरम्यान  भारताच्या या कारवाईनंतर नियंत्रण रेषेनजीक  चिनी सैन्याने रेझांग ला आणि रेचेन ला शिखरांजवळच्या भागांत सुमारे तीन हजार शस्त्रसज्ज सैनिकांना तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!