प्रश्न रोजगाराचे ” अभिव्यक्ती : स्तंभलेख : राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

Advertisements
Advertisements
Spread the love

स्वच्छतेच्या ख-या शिलेदारांना असे अर्ध्यावर सोडू नका….

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या २० वर्षांच्या अतुलनीय कामगिरीचे खरे शिल्पकार २००३ पासून पाणी व स्वच्छता विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले अधिकारी आहेत. समाजशास्त्र एमएसडब्ल्यू, पत्रकारिता, लेखा, इंजिनीअर, एमएससी, एमबीए पर्यावरण शास्त्र अशा विविध शास्त्रांचा अभ्यास केलेले हे अधिकारी आहेत. पाणी व स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी अशी एक टीम प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. या टीममधील तज्ञ सल्लागार यांना राज्य व देशपातळीवरून पाणी स्वच्छता विषयक प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमतांची वृद्धी करण्यात आलेली आहे. जिल्हा, राज्य, देश या पातळीवर असणाऱ्या पाणी आणि स्वच्छतेच्या विविध समस्यांचा विविध घटकांचा सखोल अभ्यास करून त्यांनी आपल्याला कायम विकासाभिमुख व कार्यप्रवण ठेवले आहे. सन २००० साली पाणी व स्वच्छतेचे धोरण बदलले व मागणी आधारित लोकसहभागीय धोरण राज्याने स्वीकारले. देशपातळीवर व राज्य पातळीवर या संदर्भात अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या लोकसहभागीय व मागणी आधारित धोरण, कार्यक्रम, अभियान राबवण्यासाठी वेगळा विचार करून कंत्राटी तत्त्वावर तज्ज्ञ सल्लागारांची निवड केली . या माध्यमातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य टप्पा १ व २ अशा अनेक कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली व पुढे जाऊन जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा २ या कार्यक्रमांची अंमलबजावणी करत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड पडली आहे.


आर. आर. आबा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री होते. राज्याचे ते कल्पक व दिशादर्शक नेतृत्व होते. ग्रामीण भागाची नस त्यांना माहित होती. ग्रामीण विकासात पाणीपुरवठा व स्वच्छतेला अनन्य साधारण महत्त्व आहे हे त्यांनी ओळखले होते. शासनाकडे निधीची कमतरता होती हे हेरुन त्यांनी लोकसहभागावर आधारित अभियानास सुरुवात केली. त्यास त्यांनी संत गाडगेबाबांचे नाव दिले. स्वच्छ गावांची स्पर्धा सुरू केली त्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव दिले. सामाजिक एकतेच्या पुरस्कारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जलव्यवस्थापनासाठी वसंतराव नाईक, कुटुंब कल्याणासाठी आबासाहेब खेडकर यांच्या नावाचे पुरस्कार देऊन गावाच्या विकासाला सुरुवात केली. या अभियानाला पत्रकार प्रिंट व ईलेक्ट्राॅनिक व सोशल मेडीया ने अक्षरशा डोक्यावर घेतले. पत्रकारांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल त्यांनाही पुरस्कार देवुन गाैरवण्यात आले. लोकसहभागातून गावामध्ये कोट्यवधी रुपयांची कामे झाली. या विभागाला पुढे अजितदादांचे नेतृत्व मिळाले. दादांच्या कामाचा झपाटा व अवाका लक्षात घेता दादांनी यास गती दिली. त्यांच्या काळात केंद्राने ही योजना स्वीकारून संपूर्ण स्वच्छता अभियान पूर्ण देशभर सुरू केले निर्मलग्राम पुरस्कार सुरू झाला. दादांच्या काळात देशात सर्वाधिक निर्मलग्राम पुरस्कार महाराष्ट्र राज्याने पटकावले. दादांनी निर्मळ दिंडी सारख्या अभिनव उपक्रमांची सुरुवात केली. दादांच्या काळात राज्यातील सर्व शाळा व अंगणवाड्याना शौचालय सुविधा पुरविण्यात आली. यानंतर या विभागाचे कामकाज लक्ष्मणराव ढोबळे, बबनराव लोणीकर यांनी पाहिले. प्रत्येकाने पाणी व स्वच्छतेच्या या विभागाला राज्यात व देशात कायम अग्रेसर ठेवले. पाणी पुरवठय़ाच्या बाबतीतही जलस्वराज्य, भारत निर्माण, स्वजलधारा, महाजल, आपले पाणी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम यासारख्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली. अनेक गावांमध्ये नळपाणी पुरवठ्याच्या योजना केल्या. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला. भूजल अधिनियमाची अंमलबजावणी केली. जलसंधारणाची व मृदसंधारणाची कामे केली. पाणलोट व्यवस्थापनासह भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवण्याचे काम केले. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतरही अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नव्हते ही परिस्थिती बदलण्यासाठी काम केले. पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी, कामाची गुणवत्ता, पाण्याचे व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता, पाणीपट्टी वसुली या एक ना अनेक बाबीवर ग्रामपंचायती व पाणीपुरवठा स्वच्छता समिती सोबत घेऊन गावांमध्ये आदर्श असे काम केले .

Advertisements

प्रत्येक गावातील सामान्य कुटुंबांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यामध्ये कंत्राटी कर्मचारी यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. २० वर्षांपूर्वी फार विदारक चित्र होते फक्त १० टक्के कुटुंबांकडे शौचालये होती आज ती ९० टक्केच्या पुढे आहेत. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठय़ाच्या योजना नव्हत्या त्या आता पूर्ण होत आहेत. अनेक गावांच्या योजना व्यवस्थितपणे चालू आहेत.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सुरुवातीच्या काळात चित्ररथ करणे, कलापथकांचे कार्यक्रम आयोजित करणे, लोकांना फिल्म शो दाखविणे, वाडीवस्तीवर जावून व्याख्याने देणे व लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे केलेली आहेत. लोकप्रतिनिधींचा सहभाग घेणे. जिल्हा ते गाव पातळीपर्यंतच्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांची निवड करणे त्यांना प्रशिक्षण देणे व त्यांना साधन व्यक्ती म्हणून तयार करणे अशा अनेक बाबी केलेल्या आहेत. या अभियानाच्या माध्यमातून जनतेने पाणी व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगी कराव्यात यासाठी माहिती पुस्तिका, पोस्टर्स, पॅंम्प्लेट, घडी पत्रिका, वाॅल पेटींग यासह वृत्तपत्र, आकाशवाणी, टीव्ही, लोकल चॅनेल यावर कायम बातम्या येतील याची काळजी घेतली. लोकसहभागाचे अनेक अभिनव उपक्रम राबवले गुडमार्निंग पथकासाठी पहाटे पाच वाजल्यापासून हागणदारी तुडवत असो की राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात रात्री १० वाजता गावात व्याख्यान देणे असो काळ वेळेचे भान ठेवता झपाटल्यागत काम केले. लोकसहभाग वाढावा म्हणून जनतेसोबत सफाई, स्वच्छता केली हाताला फोड येईपर्यंत शोष खड्डे खणले पण हेअभियान लोकांच्या गळी उतरवले. निर्मल दिंडी सारख्या उपक्रमांमधून कलापथक, आय.ई.सी. व्हॅन, चित्ररथ यासह मोठ्या प्रमाणावर जनतेचे प्रबोधन केले व्याख्याने दिली. शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत कीर्तनकार, कलापथक, बचत गट, युवक मंडळे, महाविद्यालयाचे युवक, शालेय विद्यार्थी, शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरू केंद्राचे स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही, जलसुरक्षक, ग्रामपंचायतस्तरावरील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, जिप सदस्य, पंस सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, यापासुन आमदार खासदार ते मंत्री या सगळ्यांना या अभियानाशी जोडले.

Advertisements
Advertisements

पाणी पुरवठय़ाची अवस्था ही काही चांगली नव्हती अनेक योजना नियोजन आणि अंमलबजावणी अभावी बंद पडत होत्या. यासाठी जलस्वराज्य आपले पाणी स्वजलधारा महाजल राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या योजनांचे चित्र अनेक गावांपुढे ठेवण्यात आलं. पाणीपट्टी हा विषय कोणाच्या अजेंड्यावर नव्हता. लोकांना पाणीपट्टीच महत्त्व सांगितलं. पाणीपट्टी वाढविण्यासाठी जनमत तयार केले. पाणीपुरवठय़ाच्या अनुषंगाने स्त्रोत बळकटीकरणावर भर दिला. पाणी पाहिजे असेल स्त्रोत चांगले राहिले पाहिजेत यासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पाणी गुणवत्ता राखली पाहिजे या बाबत प्रबोधन केलं. पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती वेळेत करण्याच महत्त्व, टिसिएलचा साठा हाताळणी व वापर, पाणी शुद्धीकरण, रासायनिक व जैविक तपासण्या, स्वच्छता सर्वेक्षण, स्रोतांच्या स्वच्छता याबाबत आरोग्याची यंत्रणा व जलसुरक्षक यांच्या माध्यमातून गावांमध्ये चांगलं काम उभं करता आलं. पाण्याचा पाणीपुरवठ्याशी फक्त संबंध न जोडता जलसंधारण, मृदु संधारण, वृक्षारोपण, पाणलोट व्यवस्थापन, या क्षेत्रातही लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे जनमत तयार करून लोकसहभागातून अनेक गावांमध्ये कामे केली.
आजही पाणी व स्वच्छतेच्या अनेक समस्या आ वासून पुढे उभ्या आहेत त्यावर आपल्याला काम करावयाचे आहे शौचालय बांधून झालेली आहेत त्याचे व्यवस्थापन, संस्थात्मक शौचालयांचे व्यवस्थापन, घनकचरा व सांडपाणीt व्यवस्थापनाची कामे, मैला गाळ व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, जल व मृदु संधारणाची कामे, पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती, पाणी गुणवत्तेची कामे, स्त्रोत बळकटीकरणाचे कामे, प्रत्येक घराला वैयक्तिक नळ कनेक्शन द्यावयाचा आहे. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, कावीळ, स्वाईन फ्लू, निपाह, इबोला, कोरोना अशा नवनवीन विषाणू व आजारांचा जन्म होत आहे. त्या अनुषंगाने अनेक कामे आपल्याला आजही करावयाची आहेत. राज्य, जिल्हा, तालुका, गावपातळीवर पाणी व स्वच्छतेचे चांगले आराखडे तयार करून केंद्राचा जास्तीत जास्त निधी राज्याला आणून दयायचा आहे. पाणी व स्वच्छतेवरचा ग्रामीण जनतेचा फोकस हलू न देता राज्याला दिशादर्शक बनवायचे आहे. पाणी व स्वच्छतेची चळवळ बळकट केली नाही तर दृश्य व अदृश्य पणे जीवितहानी व वित्त हानी होणार आहे. राज्याचे व देशाचे न भरून येणारे नुकसान होणार आहे. कोरोना सारख्या आपत्तींशी लढताना आपल्याला पाणी व स्वच्छतेचे महत्त्व कळून चुकले आहे.

राज्याला पाणी आणि स्वच्छतेच्या क्षेत्रांमध्ये देशांमध्ये अग्रभागी ठेवत असताना राज्याच्या टीमचा खांद्याला खांदा लावून जिल्हास्तरीय टीम काम करण्यास तयार आहे परंतु आऊटसोर्सिंग सारख भूत मानगुटीवर येत आहे. जागतिकीकरण औद्योगिकरण व खाजगीकरणाच्या युगामध्ये कल्याणकारी राज्याची दिशा हरवली आहे. आऊटसोर्सिंग हे पैसा मिळविण्याचे माध्यम झाले आहे. बाजारू स्वयंसेवी संस्था व कंपन्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे कोणालाही प्रश्नाचे काही देणे घेणे नाही. कर्मचाऱयांचे शोषण करून आपला खिसा कसा भरायचा हेच त्यांना माहीत आहे. यामध्ये काही न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे होऊ लागले आहे. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होवून शोधायला गेला तर पुरावा काहिच नाही. राज्याच्या विकासाचा मानवी चेहरा हरवतो की काय अशी शंका येत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धोरण निश्चित करण्याची वेळ आली आहे परंतु यांना कोणी वालीच उरला नाही. बाबा आढाव, एनडी पाटील, श्रीराम लागू, निळु फुले, भारत पाटणकर, नरेंद्र दाभोलकर, जॉर्ज फर्नांडिस, नागनाथआण्णा नायकवडी, बाबा आमटे, अनिल अवचट यांचा सामाजिक चेहरा असलेला महाराष्ट्र दिसत नाही. शासनाच्या व्यवस्था मोडीत काढण्याचे षडयंत्र चालू आहे. कामगारांचा आक्रोश आहे पण याकडे कोणालाही बघायला वेळ नाही. जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छतेच्या ज्ञानाने कौशल्याने व काम करण्याच्या दृष्टीकोनाने तयार झालेली ही टीम उद्ध्वस्त करण्याचे व राज्याच्या पाणी व स्वच्छतेच्या कामाला सुरुंग लावण्याचे काम होऊ नये असे वाटते. आऊटसोर्सिंग केल तर हि तज्ञ मंडळी या क्षेत्रात राहणार नाहीत त्यांचे भवितव्य अंधकारमय होईल त्याहीपेक्षा आजपर्यंत यांच्या जीवावर अनेक पुरस्कार देशपातळीवर आपल्याला मिळाले त्यांना असे सोडून देणे कोणत्या शहाणपणाचे लक्षण आहे. टिंग्या या मराठी चित्रपटात बैल म्हातारा झाला तरी त्याला विकु देऊ नये हा मुलाचा संघर्ष आपण पाहिला. हि तर तुमची जिवा भावाची माणस तुमच्या चळवळीत मोठी झालेली असा अर्ध्यावर डाव मोडू नका. राज्याला पाणी आणी स्वच्छतेच्या क्षेत्रांमध्ये अजूनही पुढे घेऊन जायचे असेल तर आऊटसोर्सिगचे भूत मानगुटीवरून खाली उतरवा व मोकळ्या श्वासाने पाणी व स्वच्छतेच्या संबंधी महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला द्यावे हि विनंती हे कर्मचारी करित आहेत. आता आर.आर. आबांची आठवण येत आहे. आबांची स्वप्न पूर्तता करण्यासाठी झटणाऱ्यांना शासन युज अँड थ्रो करत आहे. आबा तु्म्ही परत या किंवा दादा आमची दखल घ्या या पलीकडे आम्ही काहीही करु शकत नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा व शरद पवार साहेब, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे हे सरकार कंत्राटी कर्मचार्‍यांना न्याय देईल का याकडे तमाम कंत्राटी कर्मचारी यांच्या कुटुंबांचे लक्ष लागले आहे.

संदीप सुखधान । जि. प. बुलडाणा

आपलं सरकार