MaharashtraNewsUpdate : इंदूमिलवरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उद्या पायाभरणी , एक हजार कोटीच्या सुधारित आराखड्यास मंजुरी

Spread the love

राज्यातील महाविकास आघाडीच्यावतीने दादरच्या इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उद्या पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकातील आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पार पडणार असल्याचं एमएमआरडीएने स्पष्ट केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा राज्यातील पहिलाच सर्वात मोठा सोहळा असणार आहे. शिवाय लॉकडाऊन काळातीलही हा सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित राहणार असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्ये  इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. हे स्मारक ४५० फुटांचे, तर बाबासाहेबांचा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची आता जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे. त्यामुळे पूर्वी ७०० कोटी रुपये होणारा खर्च आता १००० कोटी रुपयांवर जाणार आहे.

या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून, त्याची प्रतिपूर्ती सरकार करणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत होणे अपेक्षित आहे. यासाठी नऊ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले असून, सर्व संरचनात्मक आराखड्यांचे १०० टक्के काम पूर्ण होऊन आवश्यक त्या परवानग्यादेखील प्राप्त झाल्या आहेत. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता. आता सुधारित खर्च एक हजार ८९ कोटी ९५ लाख अपेक्षित असून, त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्मारकाचे काम शापूरजी पालनजी कंपनीमार्फत होणार आहे. पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढणार आहे. स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. ६८ टक्के जागेत खुली हरीत जागा असेल. कित्येक वर्षांचे बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण होत असून, ते स्मारक भव्य, देखणे, दिमाखदार असणार आहे.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.