NewsInOneView : गल्ली ते दिल्ली , एक नजर : देशातील निवडक बातम्यांवर ….

Spread the love

नमस्कार . जय संविधान .

महानायक ऑनलाइनच्या गल्ली ते दिल्ली या विशेष बातमीपत्रात आपल स्वागत.

पाहुयात सुरुवातीला ठळक बातम्या

१. देशाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ / दररोज फक्त चार तास चालणार कामकाज / कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची खबरदारी

२.  केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर तडकाफडकी बंदी / महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचा मोदी सरकारविरुद्ध असंतोष

३. राज्यात सर्वत्र घरोघरी जाऊन आरोग्य पथक करणार तपासणी / जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी टाकली मोठी जबाबदारी

४.  मोदी सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय /  खासदारांच्या पगारामध्ये एका वर्षासाठी  होणार ३० टक्के कपात.

५. राज्यात गेल्या २४ तासांत  १७ हजार ६६ नवीन रुग्णांचे निदान , २५७ जणांचा मृत्यू

पाहुयात सविस्तर बातम्या

१.

देशाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला असून संसदेचे कामकाज दररोज फक्त चार तास चालणार आहे .  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात  दररोज फक्त ४ तास कामकाज होणार आहे. संसदेचे जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही  ऑनलाईन पद्धतीनेच दिली जाणार आहेत.

१४ सप्टेंबरपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे १ ऑक्टोबरपर्यंत चालेल. या काळात, सलग १८ बैठका पार पडतील, ज्यामध्ये ४५ विधेयक आणि ११ अध्यादेश आणले जातील. यानंतर संसदेचं कामकाज सुरू करण्यात येईल अशी शक्यता आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं सलग सात दिवस चालणार असून यावेळी आठवड्याची सुट्टी मिळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  अधिवेशनाचा  पहिला दिवस वगळता उर्वरित राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत  तर लोकसभेचे कामकाज दुपारी  ३ ते सायंकाळी ७  या वेळेत  चालू राहील अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी प्रश्नोत्तराच्या तासाचा वेळही एका तासांवरून  अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे.

अधिवेशनासाठी आलेल्या सर्व खासदारांना कोरोना किटही देण्यात आले असून खासदारांना आरोग्यविषयक योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचं आवरणही लावण्यात आलं असून खासदारांना उभं राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. काल पहिल्या दिवशी लोकसभेत ३५९ खासदारांनी आपली हजेरी लावली होती. अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात जवळपास ३० टक्के खासदारांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. पॉझिटिव्ह सदस्यांमध्ये शिवसेनेच्या लोकसभेतील ४ खासदारांचाही समावेश आहे.  संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली आहे.

२.

देशभरात कांद्याच्या प्रति किलो दरांमध्ये वाढ झाली असून संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मोदी सरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.यामुळे पुन्हा एकदा काद्यांचे दर घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. निर्यातबंदी लादल्यानं कांद्याच्या बाजारातली तेजी थांबण्यास मदत होईल अशी यामागची सरकारची भावना असली तरी  याचा  शेतकऱ्यांना  मोठा फटका बसण्याची शकयता निर्माण झली आहे. बिहार आणि बंगालच्या निवडणुका जवळ आल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचा आरोप  सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून केला जात आहे.  तब्बल 4 महिन्यांनी कांद्याला योग्य व चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावले होते  मात्र केंद्र सरकारने पुन्हा निर्यातबंदी लादल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे.

३.

कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे . राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल  संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत, गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करत आहोत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपवली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करत आहेत. परंतु जबाबदारी आणि खबर्दारीशिवाय हे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा  दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन असणार आहे. तसंच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही.

४.

खासदारांच्या पगाराबाबत केंद्रातील मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या वर्षात खासदारांच्या पगारामधून  ३० टक्के कपात करण्याची तरतूद असलेलं विधेयकात सरकारने लोकसभेत सादरकरण्यात आलं आहे. करोना व्हायरसच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा पैसा कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये (CIF) जमा होणार आहे. सरकारच्या आयकर, केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्कद्वारे येणारे सर्व महसूल आणि इतर निधी हा या फंडात जमा होतो. सरकारकडून करण्यात येणारा खर्चही सीएफआयमधून केला जातो मात्र संसदेच्या मंजुरीशिवाय यातून पैसे काढता येणार नाहीत. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे .

५.

बातमी कोरोनाच्या संसर्गाविषयी

राज्यात गेल्या २४ तासांत  १७ हजार ६६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून कोरोना संसर्गाने २५७ जणांचा मृत्यू झाला आहे . तर  दिवसभरात  १५ हजार ७८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले  आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहचली आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७०.१६ टक्के इतके असल्याची नोंद आजच्या आकडेवारीत करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत मुंबईत ३१ जणांचा मृत्यू झाला असून २२५६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचवेळी १४३१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. मुंबईत सध्या प्रत्यक्षात ३१ हजार ६३ रुग्णांवर उपचार सुरू असून १ लाख ३२ हजार ३४९ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.  दरम्यान पुणे शहरात आज दिवसभरात ११०० नवे करोनाबाधित आढळले, तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २० हजार ७५७ झाली आहे. तर आज अखेर २ हजार ८३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जाता जाता बातमी युजीसी नेट परीक्षेविषयी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर ढकलली आहे . हि परीक्षा  १६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. पण आता ती २४ सप्टेंबर नंतरच होईल. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून  ICAR परीक्षांचे आयोजन १६,१७,२२ आणि २३ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. त्यामुळे यूजीसी-नेट परीक्षा आता २४ सप्टेंबरनंतरच  होतील,’ अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ संचालक साधना पराशर यांनी दिली.   यूजीसी नेटचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असंही पराशर यांनी सांगितलं. दरम्यान जून २०२० मधील अनेक परीक्षा कोविड – १९ मुळे लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अनेक परीक्षांचे सुधारित वेळापत्रक ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात जारी केलं आहे.

 

Leave a Reply

आपलं सरकार