MaharashtraNewsUpdate : माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आरोग्य पथके जातील घरोघरी , मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

Spread the love

कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज संवाद साधला. राज्यातील जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत, गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करत आहोत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपवली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करत आहेत. परंतु जबाबदारी आणि खबर्दारीशिवाय हे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री हा संवाद साधतं पुढे म्हणाले कि , आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असे दिसते. २०१४ मध्ये मी शिवआरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचे प्रात्यक्षिक दाखवले होते. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे, तसे झाले तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू असंही मुख्यमंत्री म्हणाले

ऑक्सिजन टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा

सध्या राज्यात १००० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते. मात्र गरज ५०० मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढील काळात गरज पडू शकते असं, डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका किती उपयोग केला जातोय त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा असेही ते म्हणाले. ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील. या टँकर्सची वाहतूक रोखू नये. तसेच दिवसा देखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहिल, असं अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी माहिती दिली

मोबाईल अॅप देखील विकसित

या मोहिमेसाठी खास मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्हे तर आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदवण्यासाठी कामी येणार आहे. यातून योग्य रीतीने व जलदरीत्या विश्लेषण शक्य होईल, अशी माहिती रामास्वामी यांन दिली. या मोहिमेसाठी सर्व पथकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची तसेच सर्व आवश्यक प्रसिद्धी साहित्य जिल्ह्यांना देण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले. याप्रसंगी सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागांमध्ये या मोहिमेची कशी तयारी सुरू आहे त्याची माहिती दिली.

Leave a Reply

आपलं सरकार