BeedNewsUpdate : बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा निरोप दिल्यानंतर अपघातात मृत्यू

Spread the love

बीड जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दिलेला निरोप घेऊन बदलीच्या शहराकडे जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे  निरोप समारंभातील हार, पुष्पगुच्छ वाळले नाही तोच या पोलीस कर्मचाऱ्याला मृत्यूने गाठल्याची घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनीही या घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , बीड तालुक्यातील नेकनूर येथील ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी महेश आधटराव ( वय 40 ) यांचा शनिवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. बीडकडे येत असताना खजाना विहीर परिसरातील महामार्गावर ताबा सुटल्याने गाडी (एमएच 23 , एएस 6004 ) पुलावरून कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत आधटराव यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. नेकनूर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ.महेश आधटराव यांची नुकतीच गेवराई येथे बदली झाली होती.

दरम्यान शनिवारी दुपारी त्यांच्यासह बदली झालेल्या इतरांना निरोप देण्यासाठी छोटेखानी समारंभ झाला. यावेळी महेश आधटराव यांनी मनोगत व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली होती. फेटे बांधून सर्वांसोबत छायाचित्रेही काढली. मात्र निरोप समारंभातील फुले वाळली नाही तोच त्यांना मृत्यूने गाठले. आधटराव यांचा अपघाती मृत्यू पोलीस दलाला चटका लावून गेला असून त्यांना दिलेला निरोप शेवटचा आणि कायमचा ठरला. काही दिवसांपूर्वीच पावसाळ्याच्या सुरुवातीला लिंबागणेश ( ता. बीड ) येथे वादळी वाऱ्यात एका वृद्ध दाम्पत्याची झोपडी पडली. त्यावेळी महेश आधटराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः साहित्य आणून झोपडी उभा करून दिली. त्या दाम्पत्याला स्वखर्चाने नवे कपडे देखील घेऊन दिले होते असे सामाजिक भान असलेल्या पोलिसाला आज बीड पोलीस दल मुकले आहे. अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार