MumbaiNewsUpdate : निवृत्त नौदल अधिकारी हल्ला प्रकरणी खा . संजय राऊत यांनी दिले हे उत्तर

Spread the love

मुंबईत कांदीवली येथे शुक्रवारी निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर होत असलेल्या चर्चेला आणि टीकेला  खा.  संजय राऊत यांनी महत्त्वाचे निवेदन ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे हि घटना घडली होती. या हल्ल्यानंतर सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली असली तरी या घटनेवरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना पुन्हा एकदा सुरू झाला आहे. भाजपचे राज्यातील नेते शिवसेनेविरोधात आक्रमक झाले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. त्याला उत्तर देत ‘हे कायद्याचेच राज्य आहे’, असे संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने नमूद केले आहे. राऊत यांनी दोन्ही बाजूंनी संयम पाळला गेला पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे, हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणून सगळ्यांनीच जबाबदारीने, एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्णय होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे’, असे संजय राऊत यांनी या निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाचे राजकीय भांडवल करतात शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध भाजप नेत्यांनी रान उठवले आहे . दरम्यान  केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शर्मा यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली तसेच माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. मुंबईतही भाजप कार्यकर्त्यांनी सहपोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत हल्लेखोर शिवसैनिकांवर अजामीनपात्र कलमे लावण्याची मागणी केली. त्यामुळे हे प्रकरण येत्या काळात आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

आपलं सरकार