MaharashtraNewsUpdate : राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी सरकारकडून अद्याप नावेच आली नाहीत , राज्यपालांचा खुलासा

Spread the love

राज्य सरकारने विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या निवडीसाठी अद्याप  नावेच  पाठविली नाहीत, मुळात सरकारच सुस्त आहे आणि टीका मात्र माझ्यावर होते, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवला. राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली त्याला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेणारे जन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले. शुक्रवारी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

काही महत्वाच्या घटनांचे खुलासेही  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले . त्यापैकी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळी सकाळी शपथविधी उरकून घेतला, त्यावरून आपल्यावर टीका झाली होती, त्याबद्दल आपणास काय वाटते असे विचारले असता, “जर कुणी रामप्रहराला शपथ घेतली असेल, तर तुम्ही त्यावर प्रहार कशाला करता, असा प्रति  सवाल केला. तसेच  कंगना प्रकरणावरून आपण राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे का, या प्रश्नावर ‘माझी नाराजी कुणाला दिसली का, तसे मी कुणाशी काही बोललो का’, अशी   विचारणा करून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणेही टाळले.

Leave a Reply

आपलं सरकार