Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कारण -राजकारण : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी , महाराष्ट्र भाजपला बिहारी नेत्यांची मदत

Spread the love

आधी कंगना राणावत आणि आता माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेली मारहाण या प्रकरणावरून भाजप आक्रमक झालेली असताना भाजप बहुल राज्यातील त्यांचे मित्र पक्ष असलेले बिहारी नेतेही या प्रकरणाचे भांडवल करीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले आहेत . त्यामुळे  बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या राजकारणासाठी याचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. आता मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या मुद्द्यावरून बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनीही महाराष्ट्रातील आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. माजी अधिकाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण निषेधार्ह आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मारहाणीच्या या घटनांमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली आहे. ६२ वर्षाच्या माजी नौदल अधिकाऱ्याला मुंबईत शुक्रवारी शिवसेनेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे मृत्यू प्रकरण, नंतर अभिनेत्री कंगना राणावतविरोधात तिच्या ऑफिसवर मुंबई महापालिकेने सूडातून केलेली तोडफोडीची कारवाई आणि आता माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण महाराष्ट्रात चालंय काय? महाराष्ट्र सरकार करतंय का? महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मारहाण होत आहे. महाराष्ट्रातील जनतेत अशा घटनांमुळे भीतीचं वातावरण आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावं, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली आहे.  महाराष्ट्रात रहात असलेल्या बिहारी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महाराष्ट्रची जडणघडण ही फक्त कुणी एकाने केलेली नाही. तर कंगनासारख्या कलाकारांचेही त्यात योगदान आहे. पण अशाच प्रकारचे नागरिकांवर हल्ले होत राहिले आणि सूड घेतला जात असेल तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून समाजातील वास्तव जनतेसमोर मांडले. आपले परखड विचार व्यक्त केले. पण शिवसेना कार्यकर्त्यांच्या आणि पक्षाच्या सध्याच्या कृत्यांमधून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्यात आली आहे, असा हल्लाबोलही पासवान यांनी केला आहे. महाराष्ट्रात बिहारी नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बिहार सरकारसह प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. देश हा सर्वांचा आहे आणि नागरिकांना देशात कुठेही राहण्याचा अधिकार आहे, असं चिराग पासवान म्हणाले. कंगना राणावत काय निवडणूक लढवतेय का? ती स्पष्ट बोलली म्हणून तिच्यावर सूडातून कारवाई केली गेली. ही लढाई बिहारच्या सुपुत्रासाठी आहे. सुशांतसिंह प्रकरणात महाराष्ट्रात सरकार प्रश्नांपासून का दूर पळतंय? असा सवाल चिराग पासवान यांनी केला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!