MaharashtraNewsUpdate : विधिमंडळ अधिवेशन : मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली अशी चौफेर फटकेबाजी

Spread the love

राज्याच्या विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  आपल्या आपल्या समारोपाच्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. आरेतील झाडे तोडण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले कि , जी कामं करायची ती आम्ही दिवसाढवळ्या करतोय, रात्रीच्या अंधारात नाही. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो असाही अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढचे अनेक वर्षे तुमचे सहकार्य असेच राहू दे, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांना विरोधकांना घेतला. फडणवीस यांना उद्देशू बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, काम करताना इगो असता काम नये, तसा शॉर्ट कट मारू नये. रात्री चालणारी कामं आम्ही दिवसाढवळ्या करत आहोत. आरे विभाग हा संपूर्ण परिसर जंगल म्हणूज घोषित केला आहे. आरे कारशेडला जो खर्च झाला तो वाया जाऊ देणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

यावेळी बोलताना त्यांनी ” माझं कुटुंब माझी जबाबदारी”  या अभियानासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. १५ सप्टेंबरपासून एक महिना माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम सुरु करतो आहोत. दोन टप्प्यात ही योजना राबवली जाणार असून प्रत्येक कुटुंबाची आरोग्य चौकशी होणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा या अभियानाचा पहिला टप्पा असेल तर १२ ते २४ऑक्टोबर हा दुसरा टप्पा असेल. यात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. त्यात आवश्यक असेल तिथे तपासणीही करण्यात येईल. यात सर्व संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींचा सहभागही आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दरम्यान कोरोना संकटाशी लढताना सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट इतक्या लवकर संपेल असे वाटत नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व गोष्टी सुरू होत असताना आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. लोकांना कोरोनासोबत कसं जगावं, हे शिकवण्याची आता खरी आवश्यकता आहे. कोरोना संकट हे शेवटचं संकट नसून कदाचित भविष्यातील मोठ्या संकटांची ही नांदी असू शकते. त्यामुळेच लस येणार आणि हा आजार संपणार या आशेवर न राहता आपण आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष व्हायला हवं. मास्क वापरावा, हात धुवावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अधिवेशनाचे कामकाज संपत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीत सगळ्यांनी केलेलं सहकार्य याबाबत आभार मानले . तर   शेवटी   विधानसभेचे कामकाज संपल्याचे जाहीर करताना हिवाळी अधिवेशन नागपुरात ७  डिसेंबर असल्याचे उपाध्यक्षांनी घोषित केले. आणि या अधिवेशनाची राष्ट्रगीतानंतर सांगता झाली.

आपलं सरकार