Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : १५ सप्टेंबरपासून राज्यात सुरु होतेय नवे मिशन , ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ : मुख्यमंत्री

Spread the love

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील 2 कोटी 25 लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचा समावेश आहे.  ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी,पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, अतिरिक्त अभियान संचालक डॉ.सतीश पवार व आरोग्य सेवा संचालक डॉ.साधना तायडे आदी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!