Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : शासनाचं ठरलं !! अंतिम वर्षाची परीक्षा घरी बसूनच होईल , जाणून घ्या काय म्हणाले उच्च शिक्षण मंत्री ?

Spread the love

अंतिम वर्ष परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात. तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बात म्हणजे परीक्षा सोप्या पद्धतीनं होणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय कुलगुरू आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता. परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर आहेत. त्यावर चर्चा सुरू असून सोपी पद्धत वापरण्यावर एकमत झाले असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावं, असे आवाहनही शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 15 सप्टेंबरपासून सुरू करून दि. 31 ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर ठेवून दोन दिवसात शासनास कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी केली. परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, असेही राज्यपाल  कोश्यारी यांनी सांगितले.

आजच्या बैठकीविषयी माहिती देताना सामंत म्हणाले, राज्यपाल महोदय यांच्या अध्यक्षेतेखाली आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सद्याची परिस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल. असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्या संदर्भातील तयारी पूर्ण करावी. या बरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचेसुद्धा नियोजन करण्यात यावे. या संदर्भात चर्चा करण्यात आली.

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय करायचं याबाबतही आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. राज्यपाल आणि आमच्यामध्ये विसंगती नाही. आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात असून राज्यपालांशी चर्चा सकारात्मक झाली.  उद्या १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. “घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!