Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय घडलं आणि काय बिघडलं ?

Spread the love

देशाच्या माध्यमांचं लक्ष सोमवारी पूर्णतः काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीवर केंद्रित झाले होते . दरम्यानच्या काळात कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद , अहमद पटेल यांच्या ट्विटमुळे प्रसार माध्यमांनी जणू काही काँग्रेस संध्याकाळपर्यंत फुटणार अशाच बातम्या रंगविल्या होत्या. सोनिया गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव. त्यानंतर राहुल गांधी यांचं कथित वक्तव्य आणि त्यानंतर सुरु झालेली चर्चा यामुळे माध्यमांच्या न्यूजरूममधील वातावरण चांगलंच तापलं होतं. माध्यमांनी पिकविलेल्या कंड्यानुसार काँग्रेसच्या एका गटाला राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत असं वाटतं तर दुसरा गट सोनिया गांधी यांच्यासाठी आग्रही आहे असे चित्र रंगविण्यात  आले होते मात्र सायंकाळी बैठक संपल्यानंतर असे काही घडलेच नसल्याचे खुलासे  नेत्यांकडून करण्यात आले . आणि य वादावर पडदा पडला .

दरम्यान या सगळ्या नाट्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची शिष्टाई  चांगलीच कामाला आली . काँग्रेस पक्ष राजस्थान सत्ता वाचवण्यात गुंतलेला असताना, तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडलेली असताना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षतेपदावरून पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचा उल्लेख करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसेच या पत्रामागे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी नेत्यांना फटकारल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते मात्र असे काही घडलेच नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.

गुलाम नबी आझाद यांनी ट्विट करत हे स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले असे राहुल यांनी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही म्हटलेले नाही आणि त्यांनी असे बाहेरही कुठे म्हटलेले नाही, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. या वक्तव्यावरून आपण माझे भाजपशी संबंध असल्याचे सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन असे वक्तव्य प्रसारमाध्यमांनी दाखवले. मात्र, प्रसारमाध्यमांनी ही चुकीची माहिती दिली असून, आपण तसे काहीएक म्हटले नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.

खरे तर आम्ही भाजपच्या सांगण्यावरून सोनिया गांधी यांना पत्र लिहिले अशा प्रकारचे वक्तव्य काल काही काँग्रेस नेत्यांनी (काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बाहेरील) केल्याचे मी म्हटले आहे. त्यावर अशा प्रकारचे आरोप करणे अतिशय चुकीचे असून तसे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन, असे मी म्हटले असल्याचे आझाद यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. मुळात प्रारंभी राहुल गांधींनी भाजपशी संबंधित वक्तव्य केल्याचे समजल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हे देखील नाराज झाले होते. त्यांनी तातडीने ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली होती. मात्र राहुल गांधी यांनी व्यक्तीश: आपल्याला फोन केला आणि असे वक्तव्य आपण केलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणूनच मी केलेले ट्विट माज्या ट्विटर हँडलवरून काढून टाकले, असे सिब्बल यांनी आणखी एका ट्विटद्वारे स्पष्ट केले.

काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरचा असावा असं राहुल गांधी यांचं  मत असल्याचंही सांगितलं जातं आहे. मात्र असा प्रयोग आत्तापर्यंत फारसा चालला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारत पक्षाला दिशा द्यावी असं काही नेत्यांच मत आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.

या पत्रात सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यावर प्रत्यक्ष टिप्पणी करण्यात आलेली नाही, मात्र जनतेशी संपर्कात राहणाऱ्या सक्रिय नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्राची सोनिया गांधी यांनी दखल घेतली असून अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. नेत्यांनी एकत्रितपणे नवा पक्षाध्यक्ष नेमावा, आपण ही धुरा सांभाळू इच्छित नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आहे.  पंजाबचे मुख्यमंत्री अमिरदर सिंग, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद , अश्विनीकुमार यांनी मात्र गांधी कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान काँग्रेसच्या बैठकीत सुरू असलेल्या चर्चेवरून भाजपाचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘एएनआय’शी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले,”जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी आवाज उठवला, तेव्हा त्यांच्यावर भाजपाशी युती केल्याचा आरोप करण्यात आला. आता गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यासारखे नेते पूर्णवेळ पक्षाध्यक्षपदाची मागणी करत आहेत, तर त्यांच्यावरही भाजपाशी युती केल्याचा आरोप करण्यात येत आहे. असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही,” अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!