Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : न्यायालयाचा अवमान प्रकरण : प्रशांत भूषण आपल्या भूमिकेवर ठाम , ” माफी मागणार नाही…”

Spread the love

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा अवमान प्रकरणात  माफी मागण्यास पुन्हा स्पष्ट नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना माफी मागण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सोमवारी भूषण यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून माफी न मागण्याच्या भूमिकेवर आपण  ठाम असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या निर्देशानुसार, सोमवारी भूषण यांनी निवेदन सादर केले. मी माफी मागणे ढोंगीपणाचे ठरेल. माझ्या विधानांना मी नाकारले व माफीनामा सादर केला तर स्वत:च्या सदसद्विवेकाशी प्रतारणा करण्याजोगे असेल. मी केलेली विधाने सद्हेतूने केली होती. सर्वोच्च न्यायालय वा विशिष्ट सरन्यायाधीशांचा अपमान करण्यासाठी ही विधाने केलेली नव्हती. न्यायालये लोकांचे हक्क आणि घटनेचे रक्षण करणारी असतात. त्यांच्या या प्रमुख भूमिकेपासून ती दूर जात असतील तर त्यांच्याबद्दल केलेली रचनात्मक टीका होती, असे भूषण यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रशांत भूषण यांनी दोन ट्वीट करून सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या ट्वीटमुळे लोकशाहीचे खांब कमकुवत होत असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी धरले. या निकालावर भूषण यांनी, न्यायालयाने दिलेली शिक्षा मी भोगण्यास तयार असल्याचे निवेदन न्यायालयात केले होते. या विधानाचा फेरविचार करण्याची सूचना न्यायालयाने केली होती. न्यायालयाने भूषण यांना शिक्षा ठोठावलेली नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत भूषण यांनी पहिले निवेदन दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानांचा फेरविचार करेन, पण मूलभूत भूमिकेत फारसा बदल होणार नसल्याचेही न्यायालयाला सांगितले होते. मूळ निवेदनातही बिनशर्त माफी मागणार नसल्याचे भूषण म्हणाले होते. भूषण यांनी माफी मागितली तरच त्यांची शिक्षा सौम्य केली जाऊ शकते, असे न्या. अरुण मिश्रा यांनी स्पष्ट केले होते. महान्यायवादी. के. के. वेणुगोपाल यांनीही भूषण यांना शिक्षा न करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!