Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प

Spread the love

राज्य शासनाकडून आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

वर्षा बंगला 

दरम्यान  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानीही  ध्वजारोहण केले. यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. निवासस्थानातील अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजभवन 

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुंबई उच्च न्यायालय 

स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या ध्वजारोहण समारंभास श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते.

विधान भवन 

विधान भवन, मुंबई येथे आज स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेन्द्र भागवत, सभापती यांचे सचिव महेंद्र काज, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. 

महाराष्ट्र सदन, दिल्ली 

भारत देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन झाले. या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार सुरेश धानोरकर, महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासास असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!