Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : शासन निर्णय : निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा 10 हजार रुपयांची वाढ

Spread the love

राज्य शासनाने राज्यातील वैद्यकीय व दंत महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाविरुद्ध डॉक्टर्स आघाडीवर लढत असतांनाच सरकारने हा एक चांगला निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया संघटनांनी व्यक्त केलीय. या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि अतिविशेष उपचार अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्या विद्या वेतनात 1 मे 2020 पासून  दरमहा दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे. राज्य शासनावर यामुळे 29 कोटी 67 लाख 60 हजार रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना म्हणजेच सेंट्रल मार्डने या निर्णयाबद्दल  आनंद व्यक्त केला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले आहेत. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मानधनात एवढी घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या इतिहासात प्रथमच घेण्यात आल्याचा उल्लेख करून हा निर्णय घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांनीही या प्रश्‍नात लक्ष घालून  तो मार्गी लावल्याबद्दल सेंट्रल मार्डने त्यांचेही विशेष आभार मानले आहेत.

दरम्यान निवासी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. या प्रश्नावर निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. यानंतरही त्यांची मागणी प्रलंबित होती आजच्या निर्णयामुळे ती पूर्ण झाली आहे. सध्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या मार्चपासून राज्यातील निवासी डॉक्टर अग्रभागी राहुन रुग्णांना तत्परतेने सेवा देत आहेत. प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करून रुग्ण सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला आहे आणि निवासी डॉक्टर पात्र आहेत अशी भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!