Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ – धनंजय मुंडे

Spread the love

आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी सन २०२० – २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्टपर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पंधरा दिवसांनी वाढवून आता २८ ऑगस्टपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचना श्री . मुंडे यांनी याअगोदरच दिलेल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठीची मुदत आता १५ दिवसांनी वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

एखाद्या विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदवी प्राप्त केली त्याच शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेचा लाभ घेता येत होता; मात्र धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत ही अट नुकतीच रद्द केली आहे. आता कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. त्याचबरोबर योजनेतील वयोमर्यादेबाबतचा अडचणी ही आता सोडविल्या आहेत .

दरम्यान २८ ऑगस्ट २०२० पर्यंत नवीन शैक्षणिक वर्षातील इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती साठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे समाज कल्याण विभागास सादर करावेत असे श्री . धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!