Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : राजस्थान : अखेर सचिन पायलट यांची घरवापसी, राहुल – प्रियांकाची भेट घेतल्यानंतर घेतला निर्णय

Spread the love

राजस्थानमध्ये बंडखोरी करण्याच्या हालचाली करून राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे सचिन पायलट यांची अखेर घरवापसी झाली आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण  काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष आणि सरकारला साथ देणार असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षातर्फे सचिन पायलट यांचं बंड शमल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. आजच सचिन पायलट यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.

काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता होती. त्या अपेक्षेप्रमाणेच सचिन पायलट यांनी पक्षासाठी काम करण्याचं मान्य केलंय.

दरम्यान राजस्थानात सचिन पायलट हे राजकीय भूकंप घडवतील अशी शक्यता वर्तविली जात असतानाच पायलट यांनी घुमजाव केले असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली असल्याचे सांगितले जात आहे . विशेष म्हणजे महिनाभराहून अधिक काळ सचिन पायलट यांनी राजस्थानमधील राजकीय वातावरण ढवळून टाकलं होतं. हे प्रकरण काँग्रेसने शांततेने हाताळल्याने अखेर सचिन पायलट यांची घरवापसी झाली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून अधिक काळ हरयाणात डेरा टाकून बसलेले आमदार आता जयपूरला परतण्याच्या तयारीत आहेत. अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केल्याने आणि सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री केलं गेल्याने सचिन पायलट चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी बंडाचा झेंडा उगारत गेहलोत सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मात्र काँग्रेसला राजस्थानचा गड राखण्यात यश आलंय कारण सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये परतले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!