अभिव्यक्ती : संपादकीय : अरेरे , काय हे ? सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचे किती हे राजकारण ?

Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूवरून महाराष्ट्र -बिहार या दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये प्रचंड मोठे राजकारण चालू असून यामुळे राजकारणाची पातळी चांगलीच घसरत चालली आहे. सुशांच्या कथित आत्महत्येनंतर प्रत्येक बिहारी नेता सुशांतच्या पाठीशी उभा आहे तर महाराष्ट्रातील राजकारणी मुंबई पोलिसांच्या पाठीशी उभे आहेत. मुंबई पोलिसांकडून होणाऱ्या सुशांतच्या मृत्यूच्या तपासावर बिहार बरोबरच राज्यातील भाजपनेही संशय व्यक्त केला आहे त्यामुळे दिवसेंदिवस हे राजकारण भडक होत आहे.


दरम्यानच्या काळात सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर संशय घेत बिहारच्या पाटणा शहरात सुशांतच्या संशयाबाबत एफआयआर दाखल केला. यामध्ये फार बारीक विचार केला नाही तर हे स्पष्ट आहे कि, ज्या ठिकाणी किंवा ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला असेल त्या पोलीस ठाण्याकडे झिरोने दाखल केलेला गुन्हा अधिक तापाससाठी  वर्ग केला जातो पण या गुन्ह्यात बिहार सरकारने मुंबई पोलिसांवर शिष्टाई करण्याचा नादात मुंबई पोलिसांना विश्वासात न घेता थेट मुंबईत येऊन अधिक तपास सुरु केला. जेंव्हा कि , राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीच हा तपस सुरु करण्याचे आदेश दिले होते आणि त्याचा तपासही सुरु आहे. अर्थात या तपासाची दिशा काय आहे ? आणि काय काय तपास केला याचा लेखा -जोखा राज्य सरकारने बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करून बिहार सरकारच्या एकूणच भूमिकेवर न्यायालयासमोर जोरदार आक्षेप घेतला .

इकडे महाराष्ट्रात भाजपने थेट मुख्यमंत्री आणि मंत्री असलेले त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेप घेणारे आरोप केले . राज्यपाल महोदयांनाही याविषयी निवेदन देत मुंबई पोलिसांच्या तपासावर जाहीर संशय व्यक्त केला. दरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी तर पत्रकार परिषद घेऊन थेट आरोप केले . दिशा , रिया आणि रियाचे नातेवाईक यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बिहार सरकारच्या मागणीवरून केंद्र सरकारने या प्रकरणात सीबीआय आणि ईडी कडून तपास चालू केलं आहे. या सर्व कारवाईवर राज्य सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे . हे सर्व चालू असताना एका वृत्त वाहिनीने जाहीरपणे या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर मीडिया ट्रायल सुरु केली आहे . त्याला उत्तर म्हणून शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेच्या “सामना ” या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या ” रोखठोक ” या सदरातून सुशांतच्या कुटुंबियांवर थेट आरोप करताना , सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते आणि ते सुशातला मान्य नव्हते असे म्हटले आहे. मात्र सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या वरून सुशांतसिंहचे मामा आर. सी सिंह यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सुशांतच्या वडिलांनी दोन विवाह केलेले नसून संजय राऊत चुकीची माहिती देत आहेत, असे सिंह यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबियांवर केलेले आरोप  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच केल्याचा आरोप सुशांतसिंहचे काका आर. सी. सिंह यांनी म्हटले आहे. संजय राऊत अशी चुकीची माहिती देऊन आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारे बोलून एखाद्याची प्रतिमा खराब करणे चांगली गोष्ट आहे का, असा प्रश्न  त्यांनी उपस्थित केला आहे. बिहारमधील प्रत्येक जण हे जाणतो की सुशांतसिंह याच्या वडिलांनी केवळ एकच विवाह केलेला आहे, असेही ते म्हणाले.

खासदार संजय राऊत आपल्या सामनामधील रोखठोक या सदरात लिहितात, ‘सुशांतसिंह राजपूत याचे कुटुंब म्हणजे त्याचे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे चांगले संबंध नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एफआयआर दाखल करायला लावला गेला आणि मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलिस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलिस म्हणजे इंटरपोल नव्हे’ संजय राऊत पुढे म्हटले आहे  की, मुंबई पोलिसांवर आरोप करून बिहार सरकारने केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली. ही मागणी २४ तासात मान्यही केली गेली. राज्याच्या स्वायत्ततेवर हा थेट हल्ला आहे. जर सुशांतची केस आणखी काही काळ मुंबई पोलिसांच्या हातात राहिली असती तर आकाश तुटले नसते, परंतु हे राजकीय गुंतवणूक आणि दबावाचे राजकारण आहे. सुशांत एपिसोडची ‘स्क्रिप्ट’ आधीच लिहिलेली आहे.’

या सर्व  गदारोळात सुशांतसिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूचे राजकीय व्हावे हि गोष्ट महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगली नाही. यामध्ये आधी आदित्य ठाकरे आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव जोडले जावे हे सुद्धा चांगले नाही. आणि या सर्व प्रकरणाचा फायदा भाजपने राजकीय कारणासाठी करावा हि गोष्ट तर आणखी वाईट आहे. आता हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. मुळात मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू नाही हि चर्चा सोशल मीडियावरून अधिक केली गेली आणि अजूनही केली जात आहे. सुशांतच्या मृत्यूविषयी माध्यमातूनही अनेक खुलासे -प्रतिखुलासे केले जात आहेत. मुळात प्रारंभी पोलिसांनी सुशांतच्या कथित आत्महत्येनंतर केलेला इन्क्वेस्ट पंचनामा कसा केला गेला ? मेडिकल रिपोर्ट मध्ये नेमके काय म्हटले गेले ? हा तपासाचा भाग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बॉलिवूडमधील प्रस्थापितांनी सुशांतच्या केलेला मानसिक छळ, त्याची मैत्रीण आणि बिझिनेस पार्टनर म्हणून रिया चक्रवर्तीने केले आर्थिक व्यवहार असे अनेक पदर या प्रकरणाला आहेत. त्यात पुन्हा माध्यमे बातम्या म्हणून आपल्या परीने अनेक खळबळजनक खुलासे करीत आहेत. एकूण काय तर हे प्रकरण सर्वांनाच बरेच दिवस पुरणार असेच दिसत आहे.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.