CoronaIndiaUpdate : “भाभीजी पापड खाव , कोरोना भगाव ” म्हणणारे केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह , एम्स मध्ये दाखल…

Spread the love

कोरोना संसर्गाची थट्टा उडवून लोकांना गोमूत्र , पापड खाऊन, गायत्री मंत्र , हनुमान चालिसाचा  पाठ करून  कोरोनापासून दूर राहण्याचा  सल्ला देणारे मंत्रीच आता कोरोनाबाधित झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान याच कारणावरून गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मिम्समधून व्हायरल झालेले केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही करोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अवजड उद्योग आणि संसदीय कामकाज या दोन विभागांचं राज्यमंत्री पद हे मेघवाल यांच्याकडे आहे. आपला करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याच्या वृत्ताला मेघवाल यांनी दुजोरा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अर्जुन मेघवाल पापड खाण्याचा सल्ला दिल्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत काही दिवसांपूर्वी भाभीजी पापड या ब्रँडचं उद्घाटन करत असताना मेघवाल यांनी…भाभीजी पापड खाल्ल्यामुळे करोना विषाणूशी लढण्यास मदत होते असं अजब विधान केलं होतं. या पापडांमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होईल असं मेघवाल म्हणाले होते. या विधानानंतर मेघवाल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

अर्जुन मेघवाल यांच्याव्यतिरीक्त आणखी एक केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांचा करोना अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर राजस्थान येथील जोधपूर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान भारतातील महत्वाच्या शहरांना अजुनही करोना विषाणूचा विळखा कायम आहे. गेल्या काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असलं तरीही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या शहरांमधून करोनाग्रस्त रुग्णांचं प्रमाण वाढत चाललं आहे.

आपलं सरकार