CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासांत आढळले करोनाचे १२ हजार ८२२ नवे रुग्ण , २७५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

Spread the love

राज्यात करोना साथीचे नवा उच्चांक गाठणारे आकडे आज समोर आले आहेत. गेल्या २४ तासांत करोनाचे १२ हजार ८२२ नवे रुग्ण आढळले असून त्यासोबतच एकूण रुग्णसंख्या पाच लाखांचा टप्पा ओलांडून ५ लाख ३ हजार ८४ इतकी झाली आहे. आज २७५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर ११ हजार ८१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत एकूण ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्णांनी करोना विरुद्धची लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे.

राज्यात सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजच्या आकडेवारीनुसार पुण्यात ४१ हजार २६६ रुग्णांवर उपचार सुरू असून त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात करोनाचे २२ हजार ९४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनाची राजधानी असा डाग लावण्यात आलेली मुंबई मात्र बरीच सावरत आहे. मुंबईत सध्या १९ हजार ९१४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत ९५ हजार ३५४ रुग्णांनी करोनावर मात केली असून पुण्यात ६६ हजार ८९ तर ठाण्यात ७७ हजार ७३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तिन्ही शहरांत मुंबईचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे.

राज्यातील करोनाचे आजचे आकडे जास्त चिंतेचे आणि काहीसा दिलासा देणारे आहेत. राज्यात गेल्या १४ तासांत २७५ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृत्यूसंख्या १७ हजार ३६७ इतकी झाली आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या ३.४५ टक्के इतका आहे. राज्यात आज ११ हजार ८१ रुग्णांनी करोनावर मात केली. या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण करोनामुक्त झाले असून राज्यातील रिकव्हरी रेट (Recovery Rate) वाढून ६७.२६ टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात राज्यात १२ हजार ८२२ नवीन करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण २६ लाख ४७ हजार २० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५ लाख ३ हजार ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १९ टक्के इतके आहे. राज्यात सध्या प्रत्यक्षात १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आपलं सरकार