AurangabadCrimeUpdate : रक्कम दुपटीचे आमिष दाखवून व्यापा-याला लुटणारा भोंदू बाबा गुन्हे शाखेच्या जाळ्यात , ११ लाखाचा माल जप्त

Spread the love

 

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी थापाड्या भोंदूबाबाच्या  मुसक्या आवळल्या आहेत. त्याने अद्रकच्या व्यापा-याला दामदुपटीचे आमिष दाखवून चार लाखांना लुटले होते. या थापाड्या भोंदूबाबाचे नाव रहिम खान महेमुद खान (रा. बुलढाणा) असे आहे. त्याच्याकडून अकरा लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, भानुदास काशिनाथ मगर (३८, रा. हिवरखेडा, ता. कन्नड) हे अद्रकचे व्यापारी आहेत. त्यांची तालुक्यातील बहिरगाव येथील अद्रकचे व्यापारी संदीप पवार व त्यांच्या आईशी ओळख आहे. सुमारे दहा ते बारा दिवसांपुर्वी त्यांना संदीप पवारांच्या आईने सांगितले कि, एक पार्टी आहे, तुम्ही एक लाख रुपये दिले तर त्याची दुप्पट रक्कम मिळते. त्यासाठी पवारांच्या आईने भोंदूबाबा रहिम खान याचा मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर भानुदास मगर यांनी पैसे जमवायला सुरूवात केली. ५ आॅगस्ट रोजी पवारच्या आईने भोंदूबाबा रहिम खानशी भानुदास मगर यांचे बोलणे करून दिले. मोबाईलवर झालेल्या चर्चेनुसार सायंकाळी साडेसातच्या दरम्यान साठे चौक कन्नड येथे येण्यास सांगितले. भानुदास मगर हे चौकात पोहोचले. त्याठिकाणी भोंदूबाबा एका अनोळखी व्यक्तीसोबत भेटला. त्यानंतर त्याने रक्कम दुप्पट करण्यासाठी एक मीटर कोरे कापड घेण्यास सांगितले. भोंदूबाबाला कापड आणून दिल्यानंतर त्याने त्यावर हळद कुंकू टाकले. पुढे भोंदूबाबाने सांगितल्यानुसार, चार लाख रुपये एका बॅगेत टाकून भोंदूबाबा त्यांच्यासोबत एक व्यक्ती आणि भानुदास मगर हे पिशोर नाका येथे गेले. त्या चौकात भानुदास मगर हे मोबाईलवर बोलत असल्याची संधी साधली.

यावेळी भोंदूबाबा त्याच्या साथीदारासोबत चार लाख रुपये असलेली बॅग घेऊन दुचाकीवरुन उतरत कारने पिशोरच्या दिशेने पसार झाला. त्यावरुन पिशोर पोलिस ठाण्यात भानुदास मगर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मगर यांची चौकशी केली. चौकशीअंती भोंदूबाबा रहिम खान याला लक्ष्मीनगर, डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची अधिक चौकशी केल्यावर लुटमारीसाठी त्याचे आणखी पाच साथीदार असल्याचे समोर आले. त्याच्या ताब्यातून एक लाख दहा हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह््यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख १८ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक भागवत फुंदे, रामेश्वर रेंगे, सहायक पोलिस निरिक्षक दिलीप तेजनकर, उपनिरिक्षक भगतसिंग दुलत, कर्मचारी संजय काळे, विक्रम देशमुख, शेख नदीम, विनोद तांगडे, गणेश चेळेकर, योगेश तरमाळे, गणेश गोरक्षक यांनी केली.

आपलं सरकार