AurangabadCrimeUpdate : अट्टल दुचाकी चोर सिडको पोलिसांच्या जाळ्यात, बारा दुचाकी पत्र्याच्या शेडमधून हस्तगत

Spread the love

चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या अट्टल चोराला सिडको पोलिसांनी हडकोतील बळीराम पाटील शाळेजवळ सापळा रचून शनिवारी पकडले. शेख अनिस शेख युसूफ (२९, रा. बायजीपुरा, गल्ली क्र. ३१) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या आहेत.

सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश राठोड हे पथकासोबत गस्त घालत असताना निरीक्षक अशोक गिरी यांना खब-यामार्फत माहिती मिळाली. एक गुन्हेगार चोरीची दुचाकी विकण्यासाठी बळीराम पाटील चौकात येणार आहे. त्यावरुन उपनिरीक्षक रमेश राठोड यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक राठोड यांनी पथकासह बळीराम पाटील शाळेजवळ सापळा रचला. त्यावेळी तेथे आलेल्या चोराला पोलिसांनी पकडले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यावरुन त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडत हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवरुन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याचवेळी त्याने शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी केल्याचेही सांगितले. त्याने चोरी केलेल्या दुचाकी नक्षत्रवाडी भागातील एका पत्र्याच्या शेडमधून हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश राठोड, जमादार नरसिंग पवार, पोलिस नाईक संतोष मुदिराज, शिपाई ईरफान खान व एसपीओ विजयकुमार सरोदे यांनी केली.

……

महिलेचा दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : महिलेला बळजबरी दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करत एकाने विनयभंग केला. ही घटना १ आॅगस्ट रोजी सिडको, एन-७ भागातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडली. सिडको, एन-७ परिसरातील महिला कंपनीच्या बसमधून उतरत घरी पायी जात होती. तिचा छुपा पाठलाग करुन अनिल पोळ याने पेट्रोल पंपाजवळ तिला दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन महिलेने सिडको पोलिसात तक्रार दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास जमादार चव्हाण करत आहेत.

…….

घरात शिरुन मारहाण

औरंगाबाद : मुलाची सायकल उभी करण्यावरुन तसेच कपडे वाळत घातल्याच्या कारणावरुन कामगाराला मारहाण करण्यात आली. ही घटना १ आॅगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास धावणी मोहल्ल्यात घडली. कल्पेश सुजमल पाटणी (४०) यांच्या शेजारी भाड्याने राहत असलेल्या मोहिंदर उर्फ टार्झन बाखरीया याने सायकल उभी करण्यावरुन तसेच गॅलरीत कपडे वाळण्यासाठी टाकल्याच्या कारणावरुन बळजबरी घरात शिरुन मारहाण केली. त्यावरुन सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……..

बॅग लिफ्टर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

ट्रॅव्हल्स बसमधून पावणे दोन लाख रुपये असलेली बॅग लांबवलेल्या चोराला गुन्हे शाखा पोलिसांनी पाच महिन्यांनी अटक केली आहे. राहुल अशोक खंडागळे (२७, रा. तान्हाजीनगर, मुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार गजानन रमेश घोरपडे (२६, रा. केळीगव्हाण, जि. जालना, ह. मु. शिवाजीनगर, मानखुर्द, मुंबई) हा पसार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

मुंबईतील एकनाथ गिताराम पवार (३९, मुळ रा. सिंदखेड चिंचोली, ता. घनसावंगी, जि. जालना, ह. मु. इंदिरानगर, कुर्ला, मुंबई) हे सुरक्षारक्षक आहेत. ८ मार्च २०२० रोजी चेंबुर येथून निघून ते ट्रॅव्हल्स बसने ९ मार्च रोजी सकाळी बाबा पेट्रोल पंपाजवळ पोहचले. या प्रवासादरम्यान, त्याचेकडील दोन लाख ६९ हजाराची रोकड असलेली बॅग चोराने बसमधून लांबवली होती. याप्रकरणी १० मार्च रोजी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी परिसरातील सीसी टिव्ही फुटेज देखील पोलिसांनी तपासले होते. मात्र, चोराचा शोध लागला नव्हता. दरम्यान, रविवारी सकाळी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विठ्ठल चासकर यांना बॅग चोराबाबत माहिती मिळाली. त्यावरुन उपनिरीक्षक चासकर यांच्यासह सहायक फौजदार रामदास गायकवाड, जमादार सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, पोलिस नाईक सुधाकर राठोड, शिपाई रविंद्र खरात यांनी राहुल खंडागळे याचा पथकासह मुकुंदवाडीतील तान्हाजीनगरात शोध घेतला. राहुल खंडागळेला  ताब्यात घेतल्यावर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला. यावेळी त्याने साथीदार गजानन घोरपडे याने चोरी केलेल्या पैशातून कार (एमएच-२०-बीसी-५००१) अहमदनगरच्या सवेरा अ‍ॅटोमधून खरेदी केली. त्यानंतर आॅपरेशनसाठी पैशांची गरज असल्याने ती मुंबईला विकल्याचेही सांगितले.

आपलं सरकार