AurangabadCrimeUpdate : लाचेच्या सापळ्यात अडकल्यास प्रभारींसह , उपविभागीय अधिका-यांवरही कारवाईचे मोक्षदा पाटील यांचे आदेश

Spread the love

औरंगाबाद : सिल्लेगाव पोलिस ठाण्याचा निरीक्षक तीस हजाराच्या लाचेची मागणी करताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकल्याची घटना ताजी असताना तत्पुर्वी पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संलग्न असलेल्या दोघांनी देखील तीस हजारांची लाच स्वीकारली होती. या दोन्ही घटनांमुळे ग्रामीण पोलिसांची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह््याच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत असले प्रकार निराशाजनक व घृणास्पद आहेत. यापुढे अशा घटना घडल्यास प्रभारींसह उपविभागीय अधिका-यांवर देखील कठोर व गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असे आदेश जारी केले आहेत.


जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या आदेशामुळे गैरव्यवहार करणा-या पोलिसांमध्ये आता दहशत पसरली आहे. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोमध्ये तक्रार येताच लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात बरेच लाचखोर लाचेच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून आले आहेत. त्यात पोलिस दल देखील मागे नाही. १२ जुलै रोजी डब्बरच्या तीन हायवावर कारवाई न करण्यासाठी फुलंब्री, करमाड व चिकलठाण्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या कार्यालयाशी संलग्न असलेल्या रामेश्वर कैलास चेळेकर, अनिल रघुनाथ जायभाये यांनी डब्बर वाहतूकदाराकडे तीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने छापा मारला होता. मात्र, त्यावेळी चेळेकरच जाळ्यात अडकला होता. तर जायभाये लाचेची रक्कम घेऊन पसार झाला होता. त्याला १५ दिवसांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने पकडले होते. त्यानंतर त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्या दरम्यान देखील त्याने स्विकारलेली लाचेची रक्कम अद्याप ब्युरोला दिलेली नाही. ही घटना ताजी असतानाच वाळू वाहतुकदाराला ठिकाणे सांगणा-या मुलांवर कलम १०९ नुसार कारवाई न करण्यासाठी सिल्लेगावचा पोलिस निरीक्षक सय्यद शौकत अली साबीर अली याने २७ जुलै रोजी तीस हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी वाळू वाहतुकदाराने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधत निरीक्षक सय्यद शौकत अलीची तक्रार केली होती. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी खास बीडचे पथक पाचारण करण्यात आले होते.

वाळू वाहतुकदाराशी बोलताना निरीक्षक सय्यद शौकत अलीने त्याची झाडाझडती घेत व्हाईस रेकॉर्डर हस्तगत केले होते. त्यानंतर रेकॉर्डरमधील संभाषणाची टेप नष्ट करुन चीपला ओरखडे ओढले होते. याप्रकारानंतर निरीक्षक सय्यद शौकत अलीविरुध्द तो कार्यरत असलेल्या पोलिस ठाण्यात पुरावा नष्ट करणे व लाच मागणीप्रकरणी सिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

…….. काय आहे आदेशात ? 

अनेक पोलिस कर्मचारी-अधिकारी हे कर्तव्याबाबत गांभीर्य न बाळगता अवैध प्रकरणात लक्ष घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर गुन्ह्याचा तपास ,अटक करणे, प्रतिबंधक कारवाई, अवैध धंद्यांवर कारवाई करताना अनेक अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक स्वाथापोर्टी अमिषाला बळी पडत आहेत. यापुढे औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलात लाचेची घटना समोर आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचा-याविरुध्द कठोर आणि गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. शिवाय देखरेख व नियंत्रण करणा-या प्रभारी व उपविभागीय अधिकारी यांची देखील जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

…….. वाळूमाफियांचे जाळे…..

औरंगाबाद जिल्ह्यात वाळू उपसा बंद आहे. असे जरी कागदोपत्री असले तरी शहरासह जिल्हाभरात ठिकठिकाणी वाळू माफियांनी साठेबाजी सुरू केली आहे. हा प्रकार ग्रामीण भागातच नव्हे ; तर शहरात देखील पाहायला मिळतो. पोलिसांचा वाळूशी अर्थोअर्थी तसा कुठलाही संबंध येत नाही. वाळू माफियांवर कारवाई करण्याचे काम हे महसूल विभागाचे आहे. असे बरेचसे प्रकार आहेत. ज्यामध्ये पोलिसांचा थेट संबंध येत नाही. परंतू काही पोलिस वैयक्तिक स्वाथापोर्टी अमिषाला बळी पडताना दिसून येतात. काही माफिया अशाच भ्रष्ट पोलिसांना हाताशी धरून गोरखधंदा करत आहे.

आपलं सरकार