Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : वंचित बहुजन आघाडीचा लॉकडाऊन विरोध , जिम चालक , हॉटेल मालक अकोल्यात वंचित बरोबर…

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन विरोधात पुकारलेल्या असहकाराला अकोल्यातून सुरुवात झाली आहे. अकोल्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यावसायिकांनी आंबेडकरांची भेट घेऊन लॉकडाऊन विरोधाला पाठिंबा दिला आहे. राज्यात सातत्याने लॉकडाऊन वाढत आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल मालकांसह बाराबलुतेदारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या अलुतेदार-बलुतेदारांना आर्थिक मदत मिळावी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागणी केली होती. मात्र तरीही या छोट्या समाजघटकांना मदत मिळाली नाही. मात्र, छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजूर आणि सामान्य माणसांची ही कोंडी फोडण्यासाठी आंबेडकरांनी लॉकडाऊन न करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं होतं. आंबेडकरांनी या आधीच लॉकडाऊन वाढवण्यास विरोध केला होता.

राज्यात यापुढे लॉकडाऊनमध्ये वाढ करू नका, नागरिक करोना ऐवजी बेरोजगारी व उपासमारीने मरतील. सरकारने ३१ जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करू, असा इशारा त्यांनी दिला होता. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही सांगितले होते. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वाढणार आहे, असं सांगितलं जातं. नॉन मॅट्रिक्युलेट माणसाने ही धोक्याची घंटा वाजवली आहे. करोनाची दक्षता घेण्याची गरज आहे. खरे तर ज्यांचा ज्यांचा जनतेशी थेट संपर्क येतो त्यांची करोना टेस्ट करावी. ज्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न होईल, त्यांना क्वॉरंटाइन करावं आणि ज्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल त्यांनी बाहेर फिरण्यास परवानगी द्यावी, असं आंबेडकर म्हणाले होते. तुम्हाला लॉकडाऊन करायचा असेल तर करा. पण आम्ही लोकांना लॉकडाऊन मोडायला सांगणार. लॉकडाऊन मोडल्यानंतर त्याची कशापद्धतीने अंमलबजावणी करायची हे आमचं आम्ही ठरवू. दानदात्यांची दान देण्याची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवायचा असेल तर तुम्हाला आधी आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. आमचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवता येत नसेल तर आम्हाला लॉकडाऊन मोडावाच लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता. काल संध्याकाळी अकोल्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यावसायिकांनी आंबेडकरांची भेट घेऊन त्यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच लॉकडाऊनविरोधातील आंबेडकरांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे अकोल्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!