Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraUnlockUpdate : राज्यातील वाहनधारकांसाठी असे आहेत नवे नियम…

Spread the love

केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील  लॉकडाउनची मुदतही  वाढवण्यात आली असून आता ३१ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये लॉकडाउन कायम राहणार आहे. कंटेंटमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असले तरी काही दिलासा देणारे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवण्याची परवानगी देण्यात आली. सर्व सामान्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, दुचाकीवर दोन जणांना प्रवास करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची मूभा देण्यात आली होती. तर चारचाकी वाहनधारकांनाही दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत म्हणजेच एमएमआर अंतर्गत येणाऱ्या शहरांबरोबरच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये वाहनांमधून अधिक प्रवाशांना नेण्याची मूभा देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत म्हणजेच एमएमआरमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्याचा संपूर्ण भाग, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याचा काही भागाचा समावेश होत असल्याने तेथेही ही सूट देण्यात आली आहे. सरकारने या शहरांमध्ये कशाला परवानगी आहे यासंदर्भातील यादी दिली असून यामध्ये ‘अ’ विभागातील सूचनांनुसार २० वा मुद्दा हा वाहनांमधून प्रवासासंदर्भातील आहे. तर क भागातील सूचनांनुसार १२ व्या मुद्द्यानुसार या शहरांबरोबरच राज्यातील इतर शहरांमध्येही हेच नियम लागू करण्यात येणार आहेत.

असे असतील नवे नियम

> नव्या नियमांनुसार अत्यावश्यक कामासाठी टॅक्सीने जाण्यासाठी १ अधिक तीन जणांना परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच टॅक्सीमधील एक जागा म्हणजेच मागील सीटवरील मधली जागा रिकामे असणे बंधनकारक असणार आहे. सरकारने १+३ अशी परवानगी टॅक्सीला दिली आहे.

> टॅक्सीप्रमाणेच रिक्षामध्येही मधली जागा रिकामी असणे बंधनकारक असणार आहे. रिक्षामध्ये १+२ अशी परवानगी देण्यात आली आहे.

> टॅक्सीप्रमाणेच खासगी चार चाकी गाड्यांनाही १+३ अशी परवानगी देण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

> तर या नव्या नियमांमध्ये दुचाकीस्वारांना सर्वात मोठा दिलासा मिळाला असून हेल्मट आणि मास्क घालून दुचाकीवरुन दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

> प्रवासामध्ये मास्क घालणे बंधनकारक असल्याचेही या नव्या नियमांमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये दुचाकीवरुनही एकाच व्यक्तीला प्रवासास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जागोजागी नाकाबंदी असल्याने सर्व सामान्यांनी दुचाकीवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी केल्याचे पहायला मिळाले. अखेर या मागणीचा विचार करत आता दुचाकीवरुन दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!