Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AyoddhyaRamMandirNewsUpdate : अयोध्येत चाललंय काय ? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली हि माहिती…

Spread the love

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधणीसाठी येत्या ५ ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी २२.६ किलो चांदीची विट ठेवतील, असा दावा केला जातोय. मात्र, अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी याचा पूर्णपणे इन्कार केला आहे. टाइम कॅप्सूल ठेण्याची बाबही त्यांनी फेटाळून लावली आहे. तसंच राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनेही यावर स्पष्टीकरण दिले आहे.  राम मंदिर बांधण्यापूर्वी मंदिराच्या परिसरात २००० फूट खाली टाइम कॅप्सूल ठेवण्याच्या योजनेवर ट्रस्टचे सदस्य चंपत राय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची असून अशा वृत्तांवर ट्रस्टच्या अधिकृत विधानांची प्रतीक्षा केली पाहिजे, असं राय यांनी म्हटलंय. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी टाइम कॅप्सूल संदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावर चंपत राय यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर बांधण्याच्या हाचलाची सुरू झाल्याने रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ सुरू असून  यामुळे अयोध्येत भाविकांची गर्दी दिसून येत आहे. अयोध्येत भगवान रामलल्लाच्या दर्शन कालावधीतही बदल करण्यात आला आहे. दर्शनाची वेळ एक तास आणखी वाढवण्यात आली आहे. अयोध्येत सकाळी दर्शनाची वेळ एक तासाने वाढवली गेली. आता रामलल्लाचे सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. विश्रांतीनंतर दुपारी दोन वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. यापूर्वी सकाळी ७ ते ११ या वेळेत भाविकांना दर्शन घेता येत होतं.

मशिदींमधून दिला जात आहे हिंदू-मुस्लिम शांततेचा संदेश ….

दरम्यान  पाच ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, रामजन्मभूमी परिसरालगत असलेल्या मशिदींमधून हिंदू-मुस्लिम शांततेचा संदेश देण्याचे काम केले जात आहे.सर्वोच्च न्यायालयाने निर्णयानुसार प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी दिलेल्या ७० एकरांच्या रामजन्मभूमी परिसराजवळ आठ मशिदी आणि दोन मकबरे आहेत. मशिदींमध्ये अजान आणि नमाज अदा केली जाते. मकबऱ्यांच्या ठिकाणी वार्षिक ‘उर्स’ही आयोजित केले जातात. त्याला हिंदूंकडून कोणताही आक्षेप घेतला जात नाही. रामजन्मभूमी परिसराजवळ दोराहीकुआ, मशिद माली मंदिर के बगल, मशिद काझीयाना अच्छन के बगल, मशिद इमामबाडा, मशिद रियाज के बगल, मशिद बदर पांजीटोला, मशिद मदार शाह आणि मशिद तेहरीबाजार जोगीओं की, अशा आठ मशिदी आहेत. तर खानकाहे मुजफ्फरिया आणि इमामबाडा हे दोन मकबरे आहेत.

रामजन्मभूमी परिसर असलेल्या राम कोट प्रभागातील नगरसेवक हाजी असद अहमद यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राम मंदिराच्या परिसरातील मशिदी जगाला जातीय सलोख्याचे संदेश देत आहेत, हे अयोध्येचे मोठेपण आहे. राम जन्मभूमीच्या परिसरातून बारावफातचे जुलूस काढले जातात. मुस्लिमांच्या सर्व धार्मिक कार्य आणि विधींचा अन्य नागरिकांकडून आदर राखला जातो. रामजन्मभूमी परिसराजवळ मशिदींबद्दल विचारले असता मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, फक्त बाबराच्या (मुगल सम्राट) नावाने असलेल्या वास्तूबाबतच आमचा वाद झाला. अयोध्येतल्या इतर मशिदी आणि समाधींबद्दल आम्ही कधीच मुद्दा उपस्थित केलेला नाही. हे असे शहर आहे जिथे हिंदू व मुस्लिम शांततेत राहतात. मुस्लिम नमाज अदा करतात, आम्ही आमची पूजा करतो. रामजन्मभूमी परिसराला लागून असलेल्या मशिदींमुळे अयोध्येचा जातीय सलोखा बळकट होईल आणि शांतता प्रस्थापित होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. राम जन्मभूमीवरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हिंदू व मुस्लिम या दोघांनीही मान्य केला आहे. आमचा एकमेकांशी वाद नाही, असेही ते म्हणाले.

मुस्लिमांनाही  आहे धार्मिक विधींचे स्वातंत्र्य…

पाचशे वर्षे जुन्या खानकाहे मुजफ्फरिया कबरीचे सज्जदा नशीन आणि पीर सय्यद अखलाक अहमद लतीफी म्हणाले की, अयोध्येत मुस्लिमांना सर्व धार्मिक विधी करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही खानकाहे येथील मशिदीत दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो आणि वार्षिक उर्सही आयोजित करतो. रामजन्मभूमी परिसराला लागून असलेल्या शरयू कुंज मंदिराचे मुख्य पुजारी महंत युगल किशोर शरण शास्त्री, मशिदी आणि कबरींनी वेढलेल्या परिसरात प्रत्येक जण आपआपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करेल, ते दृष्य कसे याची कल्पनाच करा. ते भारताच्या खऱ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतील. हनुमानगढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनीही, राम मंदिर बांधले जाईल आणि मुस्लिमांच्या मशिदी किंवा धार्मिक प्रथांना आक्षेप घेणार नाही, असे या निमित्ताने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!