Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मोठी बातमी : आपल्या लाचखोर साहेबांवर गुन्हा दाखल होताच , ठाण्यातील कर्मचा-यांनी आनंदाने वाटले पेढे …

Spread the love

सिल्लेगाव ठाण्यातील पोलिस निरीक्षकाविरुध्द लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर कर्मचा-यांनी आनंद व्यक्त करत पेढे वाटप केले. त्यामुळे या अधिका-याचा कर्मचा-यांना किती भयंकर त्रास सहन करावा लागायचा. याचा अंदाज व्यक्त होऊ शकतो असे एसीबीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. सिल्लेगाव पोलिस ठाणे निरीक्षक सय्यद शौकत अली साबीर अली (रा. सिल्कमील कॉलनी, रेल्वे स्टेशनजवळ) याने वाळू वाहतुकदाराकडे पैशांची मागणी करुन शासकीय व्हाईस रेकॉर्डर ताब्यात घेऊन संभाषण नष्ट केले होते. त्यावरुन सिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, वाळु वाहतूकीचा व्यवसाय करण्यासाठी तक्रारदार ४०७ टेम्पो वापरतात. त्यासाठी पोलिसांना ठिकाणे सांगणा-या मुलांवर कलम १०९ नुसार कारवाई न करण्यासाठी सिल्लेगाव पोलिस ठाण्याचा निरीक्षक सय्यद शौकत अली याने तक्रारदारांकडे तीस हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदारांनी औरंगाबादच्या एसीबीकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी कारवाईसाठी बीड येथील पथकाला पाचारण केले.

या पथकात पोलिस निरीक्षक राजकुमार पाडवी, रविंद्र परदेशी, पोलिस नाईक हनुमंत गोरे, राजेश नेहरकर, मनोज गदळे, प्रदीप वीर, गणेश म्हेत्रे यांचा समावेश करण्यात आला. हे पथक २७ जुलै रोजी दुपारी सिल्लेगावात पोहोचले. तर पंचांसह तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. पोलिस ठाण्यात गेल्यावर निरीक्षक सय्यद शौकत अली याने तक्रारदारांसोबत आलेल्या दोघांना पाहून हे कोण आहेत अशी विचारणा केली. त्यावर तक्रारदाराने मित्र असल्याचे सांगताच त्याने दोघांना बाहेर थांबण्याबाबत सांगितले. त्यामुळे तक्रारदाराचे पंच असलेले मित्र निरीक्षकाच्या केबिन बाहेर थांबले. त्यानंतर निरीक्षक सय्यद शौकत अलीने तुझ्या मुलांवर कारवाई करत नाही. त्यासाठी तुला तीस हजार रुपये आणायला सांगितले होते असे म्हणाला. मात्र, त्यावेळी तक्रारदाराने १२ हजार रुपयेच जमा झाले असे सांगितले. त्यावर निरीक्षक सय्यद शौकत अली भडकला. त्याने तीस हजार आणायला सांगितल्यावरही मुर्खासारखे वागतो का असे म्हणत तक्रारदाराला धमकावले. यावेळी अचानक खुर्चीवरुन उठलेल्या निरीक्षक सय्यद शौकत अलीने तक्रारदाराचा खिसा तपासला. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग तर होत नाही ना याची खात्री केली. तसेच तक्रारदाराचा मोबाईल स्विच आॅफ केला. त्यानंतर त्याने सर्व खिसे तपासले. मात्र, त्यानंतर तो शर्टाचे बटन उघडू लागल्याने तक्रारदार हाताला हिसका देत ठाण्याबाहेर पळाला. त्यामुळे निरीक्षक सय्यद शौकत अलीने पकडा-पकडा अशी आरोळी ठोकली. त्यावेळी कार्यरत होमगार्ड व काही पोलिसांनी तक्रारदाराला पकडले.
……..

रेकॉर्डरमधील पुरावे केले नष्ट…..

तक्रारदाराला पुन्हा ठाण्यात आणल्यावर निरीक्षक सय्यद शौकत अलीने त्यांच्याकडून व्हाईस रेकॉर्डर हस्तगत केले. त्यातील संभाषणाची टेप नष्ट करुन चीपला ओरखडे ओढले. हा सर्व प्रकार पंचांसमक्ष पोलिस ठाण्यात सुरू होता. याची माहिती पंचांनी एसीबीच्या पथकाला दिली. त्यानंतर एसीबीचे पथक लगेचच दाखल झाले. मात्र, तोपर्यंत निरीक्षक सय्यद शौकत अलीने पुरावे नष्ट करुन तक्रारदाराला सोडून दिले.
…….

औरंगाबादचे अधिकारी सिल्लेगावात दाखल……

बीडच्या पथकाने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांना दिली. त्यानंतर चावरिया यांनी औरंगाबादेतील उपअधीक्षक मारुती पंडीत, ब्रम्हदेव गावडे यांना सिल्लेगावला पाठवले. या सर्व घटनाक्रमाची माहिती घेण्यासाठी उपअधीक्षक सिल्लेगावात दाखल झाले. तसेच गंगापूर विभागाचे उपअधीक्षक संदीप गावीत यांनी देखील धाव घेतली. पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार पाहून निरीक्षक सय्यद शौकत अलीची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याने व्हाईस रेकॉर्डरमधील पुरावे नष्ट केल्याची कबुली दिली.
…….

पुर्वी एसीबीचा कर्मचारी……

निरीक्षक सय्यद शौकत अली हा पुर्वी एसीबीमध्ये कार्यरत होता. त्यामुळे त्याला व्हाईस रेकॉर्डरची संपुर्ण माहिती आहे. तक्रारदाराच्या शर्टाच्या आत असलेले व्हाईस रेकॉर्डर हस्तगत केल्यानंतर त्याने डीव्हीआर कुठे आहे. अशी देखील मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यानंतर त्याने व्हाईस रेकॉर्डर व त्यातील चीपमधील पुरावे नष्ट केले होते.
……….

कर्मचा-यांचे पेढे वाटप…..

निरीक्षक सय्यद शौकत अली हा पोलिस कर्मचा-यांमध्ये जातीभेद करतो. त्यामुळे ठाण्यातील कर्मचारी वैतागले आहेत. एसीबीच्या पथकाने मंगळवारी सिल्लेगाव पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर कर्मचा-यांनी आनंद व्यक्त करत आपसात पेढे वाटप केल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!