Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयात लालकृष्ण आडवाणी यांचा जबाब

Spread the love

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात भारतीय जनता पक्ष (भाजप) ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी (वय ९२) यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब शुक्रवारी नोंदविण्यात आला. सकाळी ११.०० ते जवळपास दुपारी ३.३० वाजेपर्यंत लखनऊच्या सीबीआयच्या स्पेशल न्यायालयासमोर आडवाणी यांनी आपला जबाब नोंदवला. या दरम्यान लालकृष्ण आडवाणी यांना जवळपास १०० प्रश्न विचारण्यात आले. आडवाणी यांनी आपल्यावरील सर्व आरोपांना नाकारले आहे. अयोध्येत १९९२ साली वादग्रस्त बांधकाम विध्वंस प्रकरणात लालकृष्ण आडवाणी यांचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी हेदेखील एक आरोपी आहेत.

विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (वय ८६) यांचा याअगोदर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात जबाब नोंदविला. जोशी यांनी विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांच्यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवला. या प्रकरणी ३२ आरोपींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ ऑगस्टपूर्वी सुनावणी पूर्ण करायची असल्यानं विशेष सीबीआय न्यायालयाकडून दररोज सुनावणी सुरू आहे. यापूर्वी भाजप नेत्या उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. अयोध्येतील बाबरी मशीद सहा डिसेंबर १९९२ रोजी उद्‌ध्वस्त करण्यात आली होती.

दरम्यान अयोध्येत पाच ऑगस्ट रोजी होत असलेल्या  राम मंदिर भूमिपूजन समारंभासाठी बाबरी मशीद उद्ध्वस्त प्रकरणातील सर्व ३२ आरोपींना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी हिंदू धर्मसेना या हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष संतोष दुबे यांनी गुरुवारी केली. या मुख्य ३२ आरोपींमध्ये दुबे यांचाही समावेश आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या समारंभासाठी चारही शंकराचार्यांना आणि आंदोलनात बलिदान दिलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही या समारंभासाठी बोलवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!