Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासातील कोरोनबाधितांची संख्या पाहून हरभजनने उपस्थित केले मोठे प्रश्नचिन्ह !!

Spread the love

करोनाबाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत असले तरी दररोज वाढणारी करोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयाने  दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ इतकी झाली आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार ६०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर चार लाख २६ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

याबाबत बोलताना , भारतामध्ये जर परिस्थिती अशीच खालावत राहिली तर ‘भारतात दिवसाला एक लाख करोनाचे रुग्ण सापडू शकतात’ अशी चिंता भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगने व्यक्त केली आहे. याबाबत त्याने एक ट्विट केले आहे. कालच्या दिवसभरात किती लोकांना करोना झाला आणि किती लोकांचा करोनामुळए मृत्यू झाला, याबातचे ट्विट ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने केले होते. या ट्विटचा दाखला देत हरभजनने चिंता व्यक्त केली आहे. हरभजन म्हणाला की, ” हे असंच सुरु राहिलं तर भारतात लवकरच एका दिवसात एक लाख रुग्णही सापडू शकतात… कोणाला काळजी आहे का? ”

हरभजनने आपल्या ट्विटमध्ये चिंता तर व्यक्त केलीच आहे. पण त्याने सरकारवर टीकाही केल्याचे दिसत आहे. कारण सध्याच्या घडीला देशभरात करोनामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामध्येच मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाचे रुग्ण पाहायला मिळत आहेत.

काही ठिकाणी तर करोनाच्या रुग्णांना बेडही मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा पुरवण्यात सरकार कितीही प्रयत्न करत असली तरी ती तोकडी असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता करोना सर्वांची पाठ सोडणार तरी कधी? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. करोनावर लवकरच औषध तयार होणार असल्याचे म्हटले जात आहे. काही औषधांची चाचणीही सुरु आहे. जेव्हा करोनावरील औषध सापडेल तेव्हा परिस्थिती हळूहळू सामान्य होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

विशेष चिंता वाढवणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत देशात एक हजार १२९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या २९ हजार ८६१ इतकी झाली आहे. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. दिल्लीमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८४.८३ टक्के आहे.

राज्यात चोवीस तासांत १० हजार रुग्णवाढ

गेल्या २४ तासांत राज्यात १०,५७६ नवे रुग्ण आढळले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात २८० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. सुमारे साडेपाच हजार रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ३९,३५३ रुग्ण उपचाराधीन आहेत. दरम्यान मुंबईमध्ये बुधवारी एका दिवसात नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा करोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. १ हजार ३१० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १ हजार ५६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत असली तरी, सुरुवातीच्या टप्प्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणाऱ्या केरळमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. तमिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये दिवसभरात सुमारे ५ हजार रुग्णांची वाढ झाली. कर्नाटकातही साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये करोनाचे संकट चिंतेची बाब ठरू लागली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!