Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

थकबाकीबाबत अन्यायकारकरित्या वीज जोड कापण्यात येणार नाही : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Spread the love

जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.

लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आज मंत्रालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश डॉ. राऊत यांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी ऊर्जामंत्री म्हणाले, ग्राहकांच्या मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात यावे. सरासरी वीजबिल टाळावे, जेणेकरून वीजबिलाच्या तक्रारी कमी होतील. त्यासाठी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून नियोजन करावे. धनादेशाद्वारे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करावे. कोरोना कारणास्तव प्रतिबंधित क्षेत्रातील (कंटेन्मेंट झोन) वीजबिलाची वसुली वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सवलत याशिवाय तीन समान हप्त्यात वीजबिल भरण्याच्या सुविधेबाबत माहिती देऊन ग्राहकांच्या शंकांचे समाधान व त्यांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करावे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामाचा अहवाल मागवून अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तपासावी. बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची आवश्यकता तपासावी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून मनुष्यबळाचा सुयोग्य उपयोग करावा, असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले.

यावेळी परिवहन मंत्री ऍड. परब यांनी, विजबिलाबाबतच्या तक्रारींचे शंभर टक्के निरसन करावे, कोणाही ग्राहकाला चुकीचे बिल भरायला लागू नये याची दक्षता वीज वितरण कंपन्यांनी घ्यावी; तक्रारींबाबत जलद प्रतिसाद पद्धतीने कार्यवाहीची यंत्रणा निर्माण करावी आदी सूचना केल्या. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, टाटा वीज कंपनीचे (वितरण) उपाध्यक्ष सुनील जोगळेकर, अदानी वीज कंपनीचे उपाध्यक्ष के. पटेल उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!