Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAmitabhUpdate : दिलासादायक : जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

Spread the love

अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोना झाल्याची मुंबई बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी आल्यानंतर बच्चन कुटुंबियांपासूनच  काहीसा दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. अमिताभ व अभिषेक यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने बच्चन कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला आहे. कुटुंबातील इतर सदस्य व स्टाफचा स्वॅब चाचणी अहवाल अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, अमिताभ यांना हलका ताप होता. त्यानंतर त्यांनी करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर अमिताभ यांना उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान  एका वृत्तवाहिनीलला दिलेल्या मुलाखती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बिग बी यांच्या प्रकृतीची माहिती दिली. राजेश टोपे म्हणाले की, ‘अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठिक आहे आणि ते एसिम्टमॅटिक आहेत. एसिम्टमॅटिक असे रुग्ण असतात ज्यांच्यात आजाराची लक्षणं दिसत नाहीत किंवा फार सौम्य लक्षणं असतात.’ ७८ वर्षीय अमिताभ यांना यकृताच्या आजारासह अन्य अनेक आजार आहेत. यात आता करोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आल्यामुळे त्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याआधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. सर्वातआधी कनिका कपूरला या विषाणूची लागण झाली होती. यानंतर किरण कुमार, करीम मोरानी आणि त्याच्या दोन मुली जोआ आणि शाजा मोरानीही करोना पॉझिटिव्ह होते. दरम्यान, कोरोनामुळे मुंबईत  भीतीचं वातावरण पसरलं आहे. मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असले तरी कोरोनाचा उद्रेक होत आहे. मुंबईत मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी दिसू लागली आहे. त्याचा फटकाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, बच्चन कुटुंबीयांवर करोनाचं संकट कोसळल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी अमिताभ यांना लवकरात लवकर आराम पडावा अशी प्रार्थना केली असून  सिनेसृष्टीतून अनेकांनी त्यांना लवकरात लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या तर  परेश रावल, रितेश देशमुख, मनोज बाजपेयी, लारा दत्ता, परिणीती चोप्रासह अन्य सेलिब्रिटींनी त्यांच्या  प्रकृतीची विचारपूस केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!