Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MubaiUpdate : राजगृह तोडफोड प्रकरण : राजगृह संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान, मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

Spread the love

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’च्या आवारात घुसून झालेल्या तोडफोडीचा सर्व स्तरातून तीव्र निषेध होत असून ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. याच वास्तूमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ग्रंथ खजिना जीवापाड जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान ‘राजगृह’वर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबईच्या दादर हिंदू कॉलनी येथे ‘राजगृह’ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली. घराच्या काचांवर दगडफेक केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत,’ असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांचे आवाहन

‘राजगृह’ हे देशातील तमाम जनतेसाठी एक महत्त्वाचं ऊर्जा केंद्र आहे. या निवासस्थानाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेले आहेत. कोणतीही मनुवादी विघातक मनोवृत्ती हे विचार कदापि संपवू शकत नाही. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन केलं जाईल. राज्यातील व देशातील नागरिकांनी संयम ठेवून शांतता पाळावी,’ असं आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे. माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो,’ अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

आंबेडकर कुटुंबियांचे शांततेचं आवाहन

राजगृहावर हि तोडफोड होताच वंचित बहुजन आघाडीचे नेते व बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर , रिपब्लीकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी या घटनेनंतर सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात ताबडतोबीनं लक्ष घातलं असून  सर्वच अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले होते. पोलिसांनी अत्यंत चोख काम केलं आहे. चौकशी सुरू आहे. त्यामुळं ‘राजगृह’च्या परिसरात कुणीही गर्दी करू नये,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!