चर्चेतली बातमी : नसते लचांड नको म्हणून “कोरोनील” बाबत पतंजली आणि बाबा रामदेव यांनी हात झटकले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पतंजली आयुर्वेदाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं, “पतंजली आयुर्वेद आताही आपल्या दावा आणि औषधावर कायम आहे. आम्ही कधीही कोरोनाव्हायरसवरील औषध बनवल्याचा दावा केला नाही. सरकारची परवानगी आणि त्यांच्या गाइडलाइन्सनुसारच औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे झालेत”


मोठा गाजावाजा करीत पत्रकार परिषद घेऊन कोरोनाव्हायरसवरील  औषध कोरोनिल बनवल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीनेच आता घूम जाव केले असल्याचे वृत्त आहे. आता सगळीकडून प्रश्नांची सरबत्ती होत असताना , आम्ही कोरोनावरील औषध बनवलं नाही, असं आता पतंजली आयुर्वेदाने म्हटले  आहे. मात्र आमचं औषध कोरोनावर उपचारासाठी प्रभावी ठरत असल्याचे पतंजलीकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान  योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने कोरोनिल हे औषध तयार केलं आणि हे औषध लाँच करताना या औषधामुळे कोरोना 100 टक्के बरा होतो असा दावा केला होता. मात्र आता आपल्या या दाव्यावरून पतंजली मागे हटल्यामुळे पुन्हा एकदा बाबा रामदेव चर्चेच्या फेऱ्यात अडकणार हे स्पष्ट आहे.

Advertisements

पतंजली आयुर्वेदने 23 जूनला राजस्थानच्या निम्स युनिव्हर्सिटीसह मिळून कोरोनाचं औषध बनवल्याचा दावा केला होता. या औषधाचं नाव कोरोनिल ठेवलं होतं. हे औषध लाँच करताना कोरोना रुग्णांवर याचं क्लिनिक टेस्ट केल्याचंही सांगितलं होतं. पतंजलीने केलेल्या या दाव्यानंतर सरकारने याबाबत पतंजलीकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. आपल्याला या औषधाबाबत काहीच माहिती नाही. आधी माहिती द्या तोपर्यंत जाहिरात थांबवा, असे आदेश केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीला दिले होते. तर पतंजलीला खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता, त्यात कोरोनाच्या औषधाचा उल्लेख नव्हता, असं उत्तराखंड आयुष विभागाने म्हटलं होतं. शिवाय ज्या डॉक्टरांसह या औषधाचं ट्रायल करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं, त्या डॉक्टरांनीदेखील आपण आयुर्वेदिक औषधाचं ट्रायल केलं, कोरोनाच्या कोणत्याही औषधाचं नाही असं म्हटलं होतं.

Advertisements
Advertisements

दरम्यान केंद्रीय आयुष मंत्रालय, उत्तराखंड आयुष विभागाकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आल्या. याशिवाय ज्या राजस्थानच्या निम्स रुग्णालयात या औषधाचं ट्रायल घेण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनीही आपले हात वर केले. शिवाय कोरोनाच्या औषधाच्या ट्रायलसाठी आपल्याकडून परवानगी घेतली नसल्याचं राजस्थान सरकारने सांगितलं. बाबा रामदेव यांच्याविरोधात एका डॉक्टरनेदेखील पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसंच कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे कोरोनिलमुळे पतंजलीसमोरील अडचणी वाढतच गेल्या आणि अखेर आता पतंजलीनेदेखील आपल्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. आम्ही कोरोनाचं औषध बनवल्याचा दावा कधीच केला नव्हता. मात्र आम्ही तयार केलेल्या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे झाले असं आम्ही म्हणू शकतो. असं आयुषच्या नोटिशीला उत्तर देताना पतंजलीनं सांगितलं आहे.

 

Leave a Reply

आपलं सरकार