Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोनाचं संकट टळलेलं नाही, गर्दी करू नका, रुग्णसंख्या वाढत गेली तर पुन्हा लॉक डाऊन : मुख्यमंत्री

Spread the love

केवळ आर्थिकचक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरु केलं असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला नाही. त्यामुळे गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा. कोरोनाच्या केसेस पुन्हा वाढताना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे,  औषधोपचार आणि सुविधा देण्यात महाराष्ट्र कुठेही मागे नसून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला आवाहन केले.

कृषी दिन आणि राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांनी १ जुलै रोजी येणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या, तसेच हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस असून हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात दिवसरात्र शेतात राबून अन्नधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाही मी विनम्र नमस्कार करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तक्रारींची गंभीर दखल

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसुल केली जाईल.

कर्जमुक्त करणार

कर्जमुक्तीच्या योजनेची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी निवडणुकीची आचारसंहिता आल्याने आणि नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आला नाही, ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याचेही ते म्हणाले.

पावसाळ्यात घ्या काळजी

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लिप्टो यासारखे आजार डोके वर काढतात हे लक्षात घेऊन नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छता बाळगून कुठेही पाणी साठू देऊ नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. गर्दी करून कोरोनाला आपणहून निमंत्रण देऊ नका, गाफील राहू नका, असेही ते यावेळी म्हणाले.

गरीब कल्याण योजनेची मुदत ३ महिन्यांनी वाढवा

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ३० जून रोजी संपत असल्याने ती आणखी ३ महिन्यांसाठी वाढवून देण्याची विनंती आपण पंतप्रधानांसमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास

गुंतवणूकदारांना महाराष्ट्र आपला वाटतो ही गोष्ट खूप महत्त्वाची असून गेल्या आठवड्यात १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार विविध कंपन्यांसोबत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच यामध्ये भूमीपुत्रांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळणार असून त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयी, सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

घरातच राहा, सुरक्षित राहा. शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षण सुरु होण्याला सध्याच्या परिस्थितीत महत्त्व दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ३० जूनला लॉकडाऊन संपणार आणि सगळेच व्यवहार पुन्हा सुरु होणार या भ्रमात न राहण्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे नाहीत. पण म्हणून त्यांना प्रादुर्भाव झाला नाही असे नाही, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचे, मास्क वापरण्याचे, स्वच्छता पाळण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!