Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण : पंतप्रधान मोदींकडून बिहार निवडणुकीसाठी भारत -चीन प्रश्नाचे राजकारण होत असल्याचे टीकास्त्र

Spread the love

पंतप्रधानांकडून भारत चीन प्रश्नांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून मोदींवर टीका केली आहे. ‘पंतप्रधानांनी बिहार रेजिमेंटबद्दल केलेलं वक्तव्य शेअर करून भारतीय सैन्याला जातीपातीत वाटू नका, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. ‘बिहारमध्ये याच वर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत,’ अशी आठवणही त्यांनी या ट्विटमधून करून दिली होती.

दरम्यान ‘बिहारची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढं ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैन्य दलातील बिहार रेजिमेंटच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. ‘देशावर यापूर्वी अनेकदा संकटे आली, तेव्हा इतर रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय,’ असा सवालही शिवसेनेनं मोदींना केला आहे. बिहारमधून गरीब कल्याण रोजगार अभियानाचा प्रारंभ करताना नुकताच पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी गलवान खोऱ्यात बिहार रेजिमेंटनं गाजवलेल्या शौर्याचं स्मरण केलं होतं. प्रत्येक बिहारीला ‘बिहार रेजिमेंट’चा अभिमान असायला हवा, असं मोदी म्हणाले होते. तोच धागा पकडत शिवसेनेनं मोदींवर टीका केली आहे. ‘गलवान खोर्‍यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितले.

देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. ‘पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील ‘जात’, ‘प्रांत’ यास महत्त्व आणले जात आहे. हे राजकारण म्हणजे करोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे! महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे’, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

दरम्यान भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार आज शिवसेनेनंच मुखपत्र दैनिक ‘सामना’तून घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं भाजपच्या आणि मोदींच्या राजकारणावरही टीका करण्यात आली आहे. ‘पवारांनी छोट्या समूहांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेनेनं भाजपच्या राजकारणाचेही दाखले दिले आहेत. ‘गोपीचंद पडळकर यांना भाजपनं आमदार केलं यामागे देखील लहान समूहांना वापरण्याचं राजकारणच आहे. या राजकारणात पंतप्रधान मोदीही तरबेज झाले आहेत,’ असं शिवसेनेने मोदींच्या एका भाषणाचा दाखला देऊन म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!