Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची अवघ्या आठच महिन्यात बदली…

Spread the love

अवघ्या आठच महिन्यात पुण्याच्या तुरुंग उपमहानिरीक्षक (डीआयजी) स्वाती साठे यांची  गृह विभागाने पुणे येथून नागपुरात केलेली बदली पुण्यात चर्चेचा विषय झाली आहे. विशेष म्हणजे, या बदलीत बदल्याच्या भावना आहेत  कि काय ?  अशी शंका पोलीस वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक पोलीस कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे झुंज देत असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा बदल्या होण्याने काही अधिकाऱ्यांमध्ये  चिंतेची भावना आहे.

पुणे येथील कारागृह मुख्यालयात आस्थापना विभागाच्या उपमहानिरीक्षक म्हणून स्वाती साठे या मागील आठ महिन्यांपासून कार्यरत होत्या. त्यापूर्वी त्या पश्चिम महाराष्ट्र कारागृह उपमहानिरीक्षक या पदावर होत्या. त्यांनी नाशिक, येरवडा, मुंबईतील ऑर्थर रोड जेलच्या प्रमुख तसेच नागपूर विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून दमदार कामगिरी वाजवली आहे. अत्यंत कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांचा दरारा असला तरी, कारागृहांचे नूतनीकरण, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि बंदीवानांचे वर्तणूक सुधारणेसह त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या. त्यांच्या या सेवेची दखल गोपीनाथ मुंडे, जयंत पाटील, आर.आर.  पाटील, छगन भुजबळ यांच्यासह माजी गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

दरम्यान आठ महिन्यांपूर्वी त्यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्र कारागृह विभागाचा पदभार काढून त्यांची बदली पुणे येथे मुख्यालयात करण्यात आली होती. राज्यभरातील कारागृहांमधील आस्थापनातील बेकायदेशीर प्रकरणांबाबत साठे यांनी कठोर भूमिका घेतल्याने व थेट कार्यवाही सुरू केल्याने वरिष्ठ अधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले होते त्यातून हि बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

परवा १५ जूनला दुपारी स्वाती साठे यांच्या घरी जाऊन  कारागृह विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साठे यांना बदली आदेश दिला आणि लगेचच त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश सोपविला गेला. दरम्यान गेली पंचवीस वर्षे ज्या विभागात आपण  सेवा करत आहोत, तिथेच वरिष्ठांनी विश्वासात न घेता, थेट बदलीचा आदेश सोपवावा आणि लागलीच कार्यमुक्त करावे. या प्रकाराने साठे अत्यंत दुःखी झाल्या असल्या तरी  स्वाती साठे यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!