Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबई पोलीस दलातील चौघांचा मृत्यू , मुंबईची परिस्थिती चिंताजनकच ….!!

Spread the love

मुंबई पोलिस दलातील आणखी चौघांचा करोनाने मृत्यू झाला असून करोनामुळे मृत्यू झालेल्या मुंबईतील पोलिसांची संख्या 27 वर तर राज्यातील 40 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आजही राज्यात 3427 नवे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 568वर गेली आहे.  तर गेल्या दिवसभरात  113 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या मृतांची संख्या  3830 वर गेली आहे. आजही मुंबईत सर्वाधिक 69 मृत्यू मुंबईत झालेत  तर पुण्यात 10 मृत्यू झाले. सर्वात जास्त रुग्णही मुंबईतच सापडले असून त्यांची संख्या दीड हजारांच्या वर आहे.

दरम्यान राज्यात एकूण तीन हजारांपेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली  असली तरी त्यातून 1900 पेक्षा अधिक कर्मचारी उपचारानंतर  बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. मात्र, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांची संख्याही वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत गेल्या चोवीस तासांमधील ही सगळ्यात मोठी आकडेवारी आहे.

मरण पावलेले चार पोलीस कर्मचाऱ्यांपैकी  पोलीस नाईक पदावर रुजू असलेले संदेश केणी बोरवली पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत होते. केणी हे राहायला वसईमध्ये होते. त्यांना 6 तारखेला वसई येथील स्टार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. मात्र, कोरोनाशी लढा देत असताना ते काल मृत पावले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं आहेत. हेमंत कुंभार पोलीस हवालदार म्हणून दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचं वय 51 वर्ष होतं. ते राहायला गोरेगावला होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. पोलीस हवालदार अनिल कांबळे हे 57 वर्षाचे होते. 30 जूनला ते निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार होता. तर दीपक लोळे हे मुंबई पोलिसांच्या संरक्षण खात्यात तैनात होते. आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणारे कर्मचारी म्हणून लोळे यांची ओळख होती.

दरम्यान  मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचा रिकव्हरी रेट हा चांगला आहे. आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. 1200 पेक्षा अधिक कर्मचारी रिकव्हर झाले असल्याचं मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितलं आहे. दरम्यान आज 1550 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत 49 हजार 346 जणांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 887 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!