Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraUpdate : राज्यातील भूमिपुत्रांनी रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा , मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Spread the love

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या. कामे बंद पडू देऊ नका. भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षणही द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, करोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले. आता मुंबई महानगर परीसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. परराज्यातील मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. ते जेव्हा परत येतील तेव्हा येतील पण तोपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता विकासकामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्याचबरोबर कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे, याचाही तपशील घ्या आणि राज्यभर कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी जाहिराती द्या. खासकरून जेथे जेथे मेट्रोचे काम सुरू आहे तेथे मोठ्या प्रमाणावर जाहिराती द्या. त्यामुळे राज्यातील भूमीपुत्रांना रोजगार मिळेल. सुरुवातीच्या काळात या भूमिपुत्रांना काही काळ प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या समन्वयातून  कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले. विकासकामे करताना त्याचा प्राधान्यक्रम ठरवा, असे सांगताना पावसाळा सुरू होत आहे. करोनाच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी सुरू असलेली विकासकामे बंद आहेत. अशावेळी प्रमुख शहरांमध्ये कुठलीही अडचण, पूरस्थिती उद्भवणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तातडीने डेब्रीज उचलणे, ड्रेनेज पाइप दुरुस्ती करणे आदी कामांवर लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, नाशिक मेट्रोबाबत सादरीकरण करण्यात आले. बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, संजय बनसोड, मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!