Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यपालांच्या भेटीनंतर राज्यातील वैद्यकीय परीक्षांच्या तारखा जाहीर

Spread the love

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी – 2020 परीक्षा कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत आपण राज्यपालांना अवगत केले आहे असे अमित देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र  आरोग्य विज्ञान विद्यापीठा कडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 15 जुलैपासून  वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा  घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे मात्र काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास  याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चित केले जाईल अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. 15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी दिली आहे. राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील. कोरोना परिस्थितीमुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल. उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परिक्षांचा आराखडा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी, माजी कुलगुरु, प्रकुलगुरुंशी तसेच नियामक संस्थांशी विचारविनिमय केल्याचे अमित देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!