Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMumbaiUpdate : मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या ४५ हजाराहून अधिक , एकाच दिवसात ५३ मृत्यू

Spread the love

राज्यात कोरोनाचा कहर चालूच असून मुंबईत आज दिवसभरात ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनामुळे दगावलेल्यांची संख्या १ हजार ५१८ वर गेली आहे. दरम्यान आज मुंबईत १ हजार १५० रुग्ण सापडल्याने बाधितांची एकूण संख्या ४५ हजार ८५४ वर गेली आहे. मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४५ हजाराच्यावर गेला असला तरी मुंबईत अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने येत्या १० दिवसांत करोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढण्याची शक्यता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव समोर आला आहे. मुंबईतील आज दगावलेल्यांपैकी ४७ रुग्णांना दीर्घ आजार होते. आज दगावलेल्यांमध्ये २८ पुरुष आणि  २५ महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी दोघेजण ४० वर्षाच्या आतील होते. तर ३२ जण ६० वर्षावरील होते. तसेच १९ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील होते, असं पालिकेने स्पष्ट केलं.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील करोना रुग्णांचा मृत्यू दर ३.३ टक्के असून करोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा दर १२ दिवसांवरून २० दिवसांवर आल्याचं पालिकेने स्पष्ट केलं. आज मुंबईत ६९९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत १८ हजार ७९७ करोनाबाधित करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मुंबईच्या धारावीतील करोना रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. आज धारावीत केवळ १७ रुग्ण सापडले आहेत. धारावीत गेल्या चार दिवसांपासून २५ च्या आत रुग्ण सापडत असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यासह मुंबई अनलॉक होत असल्याने यामुळे येत्या १० दिवसांत काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढेल, असा अशी शक्यता मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे. कोरोनाच्या रूग्णांना तात्काळ खाटा उपलब्ध होण्यासाठी वॉर्ड स्तरावर डॅश बोर्ड तयार केला असून सोमवारपासून तो कार्यान्वित होईल. खासगी रुग्णालयामधून जसजसे रुग्ण डिस्चार्ज होतायत, त्यानुसार रिकाम्या झालेल्या खाटा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली. दरम्यान खासगी रूग्णालये जादा बिले आकारत असल्याच्या दाव्यांबाबत बोलताना काकाणी यांनी असे प्रकार आढळल्यास घेतल्यास पालिकेच्या नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईचा रूग्णसंख्या वाढीचा दर कमी होतोय, मृत्यूदरही कमी झाला आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!