Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffectMaharashtra : राज्य सरकारचा खासगी न्यायालयांना दणका , आदेश न मानणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा…

Spread the love

राज्य सरकारने  घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या  मुंबईतील लिलावती, जसलोक, बॉम्बे व हिंदुजा या चार खासगी रुग्णालयांना सरकारने दणका दाखवीत , कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान  सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. काही रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या बेडबाबत माहिती दर्शविणारे फलक नव्हते, शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते. क्षमतेच्या ५० टक्केही खाटांचा वापर न करताही अनेक रुग्णांना प्रतिक्षा करावी लागत आहे अशा विविध बाबी निदर्शनास आल्याने हि कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्य शासनाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. करोनाबरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे डॉ. सुधाकर शिंदे हेही त्यांच्या सोबत होते. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.

आज प्रारंभी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बॉम्बे हॉस्पिटलला भेट दिली. तिथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील एकूण खाटा, ८० टक्के नुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव खाटांची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला. या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची पूर्तता होत नसल्याचे आढळून आल्याने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम पहाटे दोन पर्यंत सुरू होती. रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहिती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी. राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रुग्णांना खाटा नाकारू नका. त्यांना वेळेवर उपचार द्या. शासनाला सहकार्य करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!