Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा असा घेतला समाचार आणि सादर केला लेखा- जोखा

Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पाचवा लॉकडाऊन लागू केल्यानंतर  आज राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पुढच्या टप्प्यातील लढाईबाबतची वाटचाल कशी असेल याची रुपरेषा सादर केली. दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केलेल्या मागणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खरपूस समाचार घेतला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, लष्कराला पाचारण करा, अशी मागणी करणाऱ्यांनी राज्यातील करोना रुग्णांची आकडेवारी एकदा पाहून घ्यावी, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे. तोपर्यंत मला सरकारची चिंता नाही, असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढला.

केंद्राने देशात काल पाचवय  लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे मनकी बात केल्यानंतर सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी सादर करताना विरोधकांचाही समाचार घेतला. राज्यात सध्या ६५ हजार रुग्ण आहेत. पण यात राज्यात सापडलेला पहिला रुग्णही धरला जातो. आतापर्यंत २८ हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या ३४ हजार रुग्णांवर उपचार सुरू असून २४ हजार रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत. त्यांना औषधोपचाराचीही गरज पडली नाही. तर साडे नऊ हजार रुग्णांना मध्यम आणि तीव्र स्वरुपाची लक्षणे आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणत राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांनी आणि लष्कराला बोलवण्याची भाषा करणाऱ्यांनी राज्यातील रुग्णांची आकडेवारी बघावी. आकडे उपलब्ध आहेत, असा टोला त्यांनी लगावला. राज्याचं चित्रं चुकीच्या पद्धतीने सादर करून राज्याला बदनाम करण्याचं कारस्थान आपलेच लोक करत आहेत. याचं दु:ख वाटतं, अशी खंत व्यक्त करतानाच जोपर्यंत तुमची मला साथ आहे. तोपर्यंत मला सरकारची चिंता नाही. सरकार कोणी पाडणारही नाही, असं ते म्हणाले.

आतापर्यंत झालेला खर्च

मुख्यमंत्री सहायता निधीत आत्तापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा झाले असून १२३ कोटी ३९ लाख १२ हजार ४१० रुपये कोरोना विषयक विविध कारणांसाठी खर्च झाली आहे. आत्तापर्यंत १ लाख २९ हजार दात्यांनी निधी दिला आहे. औरंगाबाद जवळ रेल्वे अपघातातील मजुरांना ८० लाख, सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी २० कोटी, ३ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये कोविड चाचणीसाठी, मजुरांच्या श्रमिक रेल्वेवरील तिकीट खर्चापोटी ९७ कोटी ६९ लाख ५५ हजार ४९० रुपये आणि रत्नागिरी येथील प्रयोगशाळेसाठी १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० असा निधी दिला आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानून आपले बिघडलेले संबंध या निमित्ताने मधुर करून घेतले. ते म्हणाले कि , मागच्यावेळी मी बोललो त्यामुळे तुम्ही मनावर घेतलंत आणि मजुरांसाठी ट्रेन सोडल्या. मागच्या वेळी तुम्हाला राग आला असेल पण ट्रेन सोडल्याने हजारो मजूर त्यांच्या घरी गेले, असं सांगतानाच आतापर्यंत १६ लाख मजुरांना रेल्वे आणि बसने त्यांच्या राज्यात सोडण्यात आलं आहे. ४२ हजार ५०० मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले आहे. त्यासाठी ८५ ते ९० कोटींचा खर्च आला आहे, असंही ते म्हणाले. राज्यात शिवभोजन थाळी सुरू असून १ ते ३० मे या काळात ३२ लाख ७७ हजार ७७८ लोकांना भोजन देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!