Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला हा निर्णय

Spread the love

राज्यातील विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना अंतिम सत्राच्या परीक्षांमध्ये आधीच्या सेमिस्टर्सची सरासरी काढून गुण दिले जाणार आहेत. ज्यांना श्रेणीसुधार करायचे आहे त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षा घेऊन ती संधी देण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी साधलेल्या संवादात जाहीर केला. पदवीच्या ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

या विषयी बोलताना ठाकरे म्हणाले कि , ‘आधीच्या सेमिस्टरमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून तितके गुण विद्यार्थ्यांना दिले जातील. कारण सध्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. पुढे परीक्षा कधी घेता येतील याची कल्पना नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्यापेक्षा सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करायचे, असा निर्णय आम्ही घेत आहोत. जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणीसुधार करण्याची संधी देण्यात येईल.’

दरम्यान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देऊन प्रमोट करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. मात्र राज्यातल्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत मात्र निर्णय झाला नव्हता. यूजीसीने कॅलेंडर जारी करत परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र करोना विषाणूमुळे महाराष्ट्रात विशेषत: मुंबई-पुणे मधील परिस्थिती गंभीर आहे. या दोन जिल्ह्यांसह राज्यातले अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा घेणे हे राज्य सरकारपुढे आव्हान होते. या परीक्षांवरून दरम्यानच्या काळात राज्य विरुद्ध केंद्र सरकार असे राजकारणही रंगले होते. शनिवारी ३० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतले होते. तत्पूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे परीक्षा रद्द करण्याची परवानगी मागितली होती परंतु या निर्णयावर सरकारने आता पडदा टाकला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!