Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaMumbaiUpdte : काय चालू आहे मुंबईत ? यशस्वी उपचार घेऊन घरी परतणारांच्या प्रमाणात वाढ

Spread the love

राज्यात आज ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या २१९७ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज झालेल्या ९९ मृत्यूंपैकी ८१ मृत्यू हे मुंबई महानगर प्रदेशातील आहे. तर आज नवे २९४० रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ इतकी झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात करोनाची रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी १३ वरुन आता १६ दिवसांवर पोहोचला आहे. तर परळ, माटुंगा, वरळी, भायखळा, मानखुर्द, वांद्रे या सहा विभागात हे प्रमाण २० दिवसांवर गेले आहे. या सहा विभागांसह संपूर्ण मुंबईसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ई- भायखळा, एफ/उत्तर- माटुंगा, जी/दक्षिण- परळ, जी/उत्तर-दादर, एच/पूर्व- वांद्रे, एम/पूर्व-मानखुर्द विभागांची रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी २० दिवस आहे. तर डि-गिरगाव, १९ दिवस, ए-कुलाबा आणि एल-कुर्ला १७ दिवस, के/पश्चिम-अंधेरी १८ दिवस, बी-मशिद बंदर १६ दिवस याप्रमाणे विविध विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. रुग्ण बरे होण्याचे वाढलेले प्रमाण आणि संक्रमणाचा कालावधी वाढणे या दोन्ही कामगिरीबद्दल पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यांनी पालिकेच्या कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान पालिका आयुक्तांनी कोरोना बाधिताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी  नवीन निर्देश दिले असून येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीदरम्यान आयुक्त चहल यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेल्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घेतला. या बैठकीला सर्व अतिरिक्त पालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, रुग्णालयांचे प्रमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय प्रयोगशाळांनी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर थेट व परस्पर रुग्णास दूरध्वनी किंवा मेसेज करुन कळवू नये. त्यामुळे अनेकदा रुग्ण गोंधळून जातात किंवा पालिकेकडून रुग्णाशी संपर्क होण्याआधीच घाबरुन जाऊन रुग्णालयांची शोधाशोध करु लागतात. त्यातून इतरांना बाधा होण्याची शक्यता असते. हा गोंधळ व धावपळ टाळता यावी, यासाठी हे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय  बाधित रुग्णांची यादी पालिकेच्या आरोग्य खात्याकडे पाठवावी, आरोग्य खात्याने प्रशासकीय विभागनिहाय रुग्णांची नांवे संबंधित विभाग कार्यालयांना पुरवावी, विभाग कार्यालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तृतीय व चौथ्या वर्षाच्या इंटर्न डॉक्टरांचे पथक नेमावे, या पथकाने संबंधित बाधित रुग्णाशी संपर्क साधून त्यांच्याशी योग्य चर्चा करावी, त्यांची माहिती घ्यावी व त्यांना आवश्यक त्या रुग्णालय अथवा केंद्रामध्ये नेण्यासाठी समन्वय साधावा अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोरोनामुळे मृत्यूदर वाढत असल्याचा आरोप केला आहे. त्याला पालिकेने एक प्रकारे उत्तर देत मुंबईतील मृत्यू दर ३.२ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीच्या जवळ असल्याचे म्हटले आहे. शनिवारपर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ४३ टक्के रुग्ण यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढले असल्याचे आढळून आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!