Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात ११४ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग , एकूण संख्या दोन हजाराच्या वर…

Spread the love

राज्यात कोरोनाचा कहर चालूच असून गेल्या २४ तासांत ११४ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. तर एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २ हजार ०९८ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ६२ हजार २२८ इतकी झाली आहे. करोनाशी लढा देताना राज्याच्या पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

मुंबई पोलीस दलात सर्वाधिक कर्मचारी करोनाबाधित आहेत. लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील पोलीस दलावर प्रचंड ताण आहे. पोलिसांवर सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीसह कोरोनाला रोखण्याचे  आव्हान असताना विषाणूचा घट्ट विळखा बसला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ११४ पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा या कोरोनाने  बळी घेतला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधित पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या आता २,३२५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा काल, शुक्रवारी करोनामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलातील मृत्यूची संख्या १६ झाली आहे. करोनामुक्त झालेल्या पोलिसांची एकूण संख्या ९७० एवढी आहे.

दरम्यान, राज्यात फक्त पोलिसांसाठी विशेष रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. करोनाविरोधात लढा देणाऱ्या राज्यातील पोलिसांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्देश दिले असून  पोलिसांसाठी विशेष रुग्णालय असावे त्यादृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, असेही देशमुख म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!