Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बॅरिस्टर बी. एन . देशमुख यांचे निधन

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभिमराव नरसिंगराव देशमुख (बी. एन.) देशमुख काटीकर (वय ८५) यांचं गुरुवारी मध्यरात्री निधन झालं. त्यांचे मागे मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अॅड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाचे होत. उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसंच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले होते.

बी एन देशमुख यांचे मूळ राहण्याचे गाव तुळजापूर तालुक्यातील काठी हे गाव. त्यांचे वडील उस्मानाबाद येथे वकिली व्यवसाय करीत असत. बी. एन. देशमुख यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंड येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिवंगत रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायला सुरुवात केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, असा त्यांचा आग्रह होता. औरंगाबादला खंडपीठाची आवश्यकता का आहे, यावर ते अनेकदा बोलत. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाल्यानंतर मुंबईतील वकिली व्यवसाय बंद करून ते औरंगाबादला आले. तिथं वकिली सुरू केली. १९८६ मध्ये त्यांची न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली. ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिले. १९९७ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते निवृत्त झाले.

कालांतराने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या वकिलीस प्रारंभ केला. वयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय बंद केला आणि दिल्ली सोडून ते औरंगाबादला स्थायिक झाले होते. विधान परिषदेत सहा वर्षे त्यांनी शेकापचे प्रतिनिधित्व केले होते. या काळात राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!