Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या २४६ घटना, ८२७ जणांना घेतले ताब्यात , जाणून घ्या लॉकडाऊन काळातील गुन्हे

Spread the love

राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १२ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४६ घटना घडल्या. त्यात ८२७ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २२ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,१२,७२५ गुन्हे नोंद झाले असून २२,७५३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी २२ लाख ९८ हजार ४७७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

१०० क्रमांक

पोलीस विभागाचा १०० क्रमांक हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या १०० क्रमांकावर प्रचंड भडिमार झाला. ९५,४६७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ४,९७,७०५ व्यक्ती क्वॉरंटाईन आहेत, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ४,१५,५९१ पास देण्यात आले आहेत. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३१७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ६९,४३५ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील १० पोलीस व १ अधिकारी असे एकूण ११, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१ ठाणे शहर १ व  अशा १८ पोलीसवीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या १३२ पोलीस अधिकारी व ९९१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

राज्यात एकूण १६८०  रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास १,१६,७१७  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.  त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!