#GoodNewsUpdate : प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या, 200 रेल्वे गाड्यांसाठी आजपासून बुकिंग…

Spread the love

रेल्वेने केली आणखी एक घोषणा , श्रमिक ट्रेनलाही असतील एसी कोच

या ट्रेनच्या बुकींगसाठी वेटिंग आणि आरएसी तिकीटाचीही सुविधा

देशभरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी रेल्वेने रोज अतिरिक्त २०० नॉन एसी ट्रेन चालवण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर या ट्रेनसाठी आज २१ मेपासून बुकींग सुरू होणार आहे. IRCTC ची वेबसाइट किंवा अॅपवरून उद्या सकाळी १० वाजल्यापासून बुकींग करता येणार आहे. स्थलांतरीत मजुरांसाठी रोज २०० अतिरिक्त नॉन एसी ट्रेन चालवण्यात येतील, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी दिली होती. पण आता या ट्रेनमध्ये एसी आणि जनरल डबेही असणार आहेत. यानुसार या ट्रेनच्या बुकींगसाठी वेटिंग आणि आरएसी तिकीटही मिळणार आहे, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलंय. पण वेटिंग तिकीट असणाऱ्यांना ट्रेनने प्रवासाची परवानगी नसेल.

दरम्यान या ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी स्क्रिनिंग केले जाईल. ज्यांच्या करोनाची लक्षणं आढळून येणार नाहीत त्यांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल. ट्रेनमध्ये रेल्वेकडून चादर देण्यात येणार नाही. प्रवाशांनी घरूनच स्वतःसाठी चादर घेऊन यावी. तसंच सर्व प्रवाशांना आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करणं सक्तीचं आहे. यासोबत मास्क लावणं बंधनकारक आहे, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. प्रवाशांना ट्रेन निघण्याच्या किमान दीड तास आधी स्टेशनवर यावं लागणार आहे. तिकीट रद्द करण्यासाठी रेल्वेने ठरवलेले नियम लागू असतील.

केंद्र सरकारच्या वतीने लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरीत मजुरांना गावी सोडण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेत. आतापर्यंत रेल्वेकडून १६०० ट्रेन चालवण्यात आल्या. याद्वारे २१.५ लाख स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात आलंय. पण तरीही अनेक राज्यांमध्ये लाखो मजूर अडकून आहेत. या मजुरांना रेल्वेने दिलासा दिलाय. १ जूनपासून रोज २०० अतिरिक्त ट्रेन मजुरांसाठी चालवण्यात येणार आहे.

आपलं सरकार