Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबईकर तर मुंबईकर !! परप्रांतीयांची बांद्रा स्थानकात तोबा गर्दी , लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांची मोठी कसरत

Spread the love

https://twitter.com/ANI/status/1262679725714989058

एकीकडे मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्याचे कसोशीचे प्रयत्न राज्य सरकार करीत असताना दुसरीकडे मुंबईकर आणि परप्रांतीय मजुरांनी सरकारच्या आज नाकी नऊ आणले आहेत. आज बांद्रा स्थानकावरून बिहारकडे श्रमिक रेल्वे रवाना होणार असल्याची माहिती मिळताच हजारो परप्रांतीयांनी बांद्रा स्थानकावर तोबा गर्दी करीत सोशल डिस्टंसिंगचा पार बोजवारा उडविला. या रेल्वेमधून केवळ १००० प्रवाशांना जाण्याची व्यवस्था केलेली असताना अचानक हि गर्दी उसळली . पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत ज्यांच्याकडे तिकिटे आहेत त्यांनाच रेल्वेमध्ये प्रवेश देण्यात आला तर बाकी गर्दी पांगविण्यात आली. दरम्यान दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता दिलेली नसतानाही मुंबईकर आज अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असल्याचे दृश्य दिसले. कांदिवलीहून मुंबईकडे खासगी वाहनाने निघालेल्या या मुंबईकरांमुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आल्याने वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू करून  एकच दिवस झाला आहे.  विशेष म्हणजे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची प्रवासाची सूट देण्यात आलेली नाही. असे असतानाही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नेहमीप्रमाणे जशी वाहतूक कोंडी होते, तशीच वाहतूक कोंडी आज अचानक पाहायला  मिळाली. कांदिवली, मालाड, जोगेश्वरीमधील अनेक लोक खासगी वाहने घेऊन मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडल्याने कांदिवलीपासून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहने घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांपैकी अनेकजण अत्यावश्यक सेवेतील कामगार आहेत. काही लोकांकडे पासही आहेत. तर काही लोक केवळ नातेवाईकांना भेटण्यासाठी कुटुंबकबिल्यांसह मुंबईकडे निघाले आहेत. अनेकांकडे लहान मुलेही आहेत. काहींना एसी दुरुस्त करण्याचे काम करायचे आहे, तर काहींना डायमंड मार्केटमध्ये जाऊन कामगारांना पगार वाटप करायचा आहे. तर काहींना औषधे आणण्यासाठी मुंबईला जायचे आहेत.

दरम्यान  प्रत्येक जण वेगवेगळ्या बहाण्याने घराबाहेर पडल्याने सकाळी सकाळीच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वाहतूक कोंडीमुळे जॅम झाला आहे. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा कुठपर्यंत आहेत, हे पाहण्यासाठी लोक गाडीतून बाहेर पडत असल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची ऐसीतैसी झाली आहे. लॉकडाऊनपूर्वी या एक्सप्रेस हायवेवर ज्या प्रकारची कोंडी असते तशीच कोंडी आज या ठिकाणी पाह्यला मिळत असून लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडालेला दिसत आहे. अंधेरी ते बोरिवली दरम्यान नाकाबंदी नसल्याने अनेकांचं फावलं असून त्यामुळेही ही वाहतूक कोंडी झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अंधेरी ते मुंबई दरम्यान अनेक ठिकाणी नाकाबंदी असून या ठिकाणी या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. वाहने थांबवून वाहनचालकांकडील पास तपासला जात आहे. मुंबईत अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईच्या अनेक भागात जाण्यास आणि या भागातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. असं असतानाही अनेक लोक मुंबईच्या दिशेने जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!